मांगी गावातून गाळ घेवून जाणाऱ्या अवजड ‘डंपर’ला मिळाला पर्यायी रस्ता – ग्रामस्थांच्या मागणीला यश..
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – मांगी गावातून गाळ घेवून जाणाऱ्या अवजड ‘डंपर’ला अखेर पर्यायी रस्ता दिल्याने ग्रामस्थांच्या मागणीला यश आले आहे. याबाबत साप्ताहिक ‘संदेश’च्या न्यूज पोर्टलने शुक्रवारी (ता.19) बातमी प्रसिद्ध केली होती, यामध्ये मांगी गावातील नागरीकांना या अवजड डंपरमुळे खूपच त्रासाला सामोरे जावे लागत होते, तसेच अनेक अपघातही झाले होते, त्यामुळे ग्रामस्थांनी यासाठी पर्यायी मार्गाने ही वाहतूक व्हावी अशी मागणी केली होती, अखेर या मागणीला यश आले आहे.
मागील काही दिवसांपासून मांगी तलावातून प्रचंड प्रमाणात गाळ उपसा चालू आहे. तलावातून गाळ वाहून नेणारे ओव्हरलोड टिप्पर (डंपर) प्रचंड वेगाने मांगी गावातून ये – जा करत होते. त्यामुळे टिप्पर मधील अतिरिक्त गाळ रस्त्यावर पडत असे. मागील दोन-तीन दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे व रस्त्यावर पडलेल्या गाळाने सुजित बागल वस्ती ते मांगी रोड अत्यंत निसरडा झाला होता. त्यामुळे मांगी गावात बऱ्याच दुचाक्या गाड्या घसरून अनेक अपघात झाले होते. या प्रकाराविरुद्ध मांगी ग्रामस्थांनी आवाज उठवून सदरची गाळ वाहतूक मांगी तलावाच्या डाव्या कॅनल पट्टीने यशस्वीपणे वळविण्यात आलेली आहे. त्यामुळे मांगी गावातील नागरिकांचे जनजीवन सुरक्षित झाले आहे.
मागील काही दिवसांपासून मांगी तलावातून प्रचंड प्रमाणात गाळ उपसा चालू आहे. डंपरची 24 तास वाहतूक हाेत गाळ वाहून नेण्यात येत आहे, यात अनेक अपघातही घडलेले आहेत, त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थांनी यासाठी प्रयत्न केले व ही वाहतूक दुसरीकडून नेल्याने अनेक होणाऱ्या अपघातापासून सुटका झाली आहे. – ॲड.विक्रम चौरे (मांगी)