ज्येष्ठांचा सन्मान हीच खरी संस्कृती – डॉ. हिरडे

करमाळा/संदेश प्रतिनिधी :
ज्येष्ठांचा सन्मान करणे, त्यांचा आदर करणे, त्यांची सेवा करणे आणि त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करणे हीच आपल्या संस्कृतीची खरी ओळख असून, जीवनाचा खरा उद्देश आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. ॲड. बाबुराव हिरडे यांनी केले.

झरे (ता. करमाळा) येथे बँक अधिकारी सुनील बळवंत यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ झरेगावातील ज्येष्ठ नागरिकांचा शाल, काठी, श्रीफळ आणि गणपती मूर्ती देऊन सन्मान केला. तसेच स्वातंत्र्यसैनिक व माजी सैनिकांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमात गाव व परिसरातील सुमारे 500 नागरिकांना गणेश मूर्तींचे मोफत वाटप करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. हिरडे म्हणाले, “बळवंत कुटुंबियांनी आई-वडिलांच्या स्मृती जपून समाजासाठी जे दातृत्वाचे कार्य सुरू ठेवले आहे, ते अनुकरणीय आहे. जीवनामधील खरे यश म्हणजे दातृत्व. ज्यांची कुवत आहे त्यांनी समाजासाठी काहीतरी देणे हीच खरी सन्मानाची बाब आहे.”

बळवंत कुटुंबाच्या दातृत्वाचा उल्लेख करताना ते पुढे म्हणाले, “स्व. वाल्मीक बळवंत गुरुजी यांनी स्वतः चिखलाच्या गणपतीच्या मूर्ती तयार करून गावकऱ्यांना मोफत दिल्या. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने इंदुमती बळवंत यांनी हे कार्य जोपासले. आता गेल्या पाच वर्षांपासून त्यांचे चिरंजीव सुनील बळवंत यांनी हा वारसा जोमाने पुढे चालवला असून, समाजासाठी हे प्रेरणादायी कार्य आहे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक झरे गावचे माजी सरपंच शिवाजीराव पिसाळ यांनी केले. सूत्रसंचालन हरिभक्त परायण भाऊसाहेब जाधव यांनी केले. ह.भ.प. जाधव महाराज आदर्श शिक्षक संतोष माने,पत्रकार सिद्धार्थ वाघमारे,हर्षवर्धन गाडे तसेच कोळी समाजाचे हरिभक्त परायण विठ्ठल महाराज मोरे ,रामभाऊ महाराज कुदळे ज्येष्ठ नागरिक म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तू भाऊ घाडगे व 96 वर्षाचे त्र्यंबक गणपत गुंजाळ, महादेव मावलकर हे उपस्थित होते .कोळी कुटुंबीयावरती प्रेम करणारे ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

