वंचित मुलांच्या शिक्षणासाठी खडकीत ‘निराधार सेवाभावी संस्थेचे’ वसतीगृह सुरू

करमाळा : खडकी (ता. करमाळा) येथे निराधार सेवाभावी संस्थेच्या वतीने अनाथ, निराधार तसेच ऊसतोड मजुर, वीटभट्टी कामगार, भटके विमुक्त, कलावंत व आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह व अनाथाश्रमाचे उद्घाटन रविवारी (दि. १७ ऑगस्ट) उत्साहात संपन्न झाले.

हा कार्यक्रम खडकी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.चंद्रकला बरडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी उपस्थित मार्गदर्शक व पोलीस उपनिरीक्षक (मुंबई) बाबाजी विठोबा जाधव यांनी “शिक्षण घेताना वंचित व कष्टकरी वर्गातील मुलांना भेडसावणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी हे वसतीगृह उभारले असून, या माध्यमातून त्यांच्या शिक्षणाची गती खंडीत होऊ नये हा आमचा प्रयत्न आहे,” असे प्रतिपादन केले.

संस्थेचे मार्गदर्शक सर्जेराव जाधव यांनी प्रास्ताविक करताना संस्थेची स्थापना, प्रवास व वसतीगृह उभारणीमागील उद्देश यावर प्रकाश टाकला. समाजातील सर्व घटकांनी या उपक्रमाला हातभार लावावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी पोलिस उपायुक्त नागेश जाधव, एकलव्य आश्रमशाळेचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण (बाबा) माने, राष्ट्रवादी (शप) पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष वारे तसेच पत्रकार अलिम शेख यांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करून भविष्यात आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला उपसरपंच भाऊसाहेब खरात, माजी सरपंच अंगद शिंदे, बळीराम शिंदे, रमेश गायकवाड, ग्रामसेविका सौ. रंजना उंडे, पोलीस पाटील अक्षय गायकवाड, करमाळा कृ.उ.बा. समितीचे जनार्धन नलावडे, डॉ. अशोक शिंदे, चेअरमन उमाकांत बरडे, सोसायटी चेअरमन संतोष शिंदे, नाथपंथी गोसावी समाजाचे अध्यक्ष प्रकाश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष आहेर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन विजय शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन सचिव सौ. शितल आहेर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दादाराव आहेर, मोहन शिंदे, साहेबराव सावंत, विकास शिंदे, रघुभाई, महादेव कुंभार, ईश्वर खरात व संदीप मिरगे यांनी विशेष परिश्रम घेतले.
