महिलांची फसवणूक – संशयिताला अटक करण्यासाठी सुरू केलेले उपोषण अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर स्थगित…

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा (ता.14) : गोड बोलून महिलांची फसवणूक करणाऱ्या अश्विनी भालेराव हीला अटक करा, या मागणीसाठी अन्यायग्रस्त महिलांनी सुरू केलेले उपोषण अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर तूर्त स्थगित करण्यात आले आहे.
येथील अश्विनी भालेराव हीने बचतगटाच्या माध्यमातून कष्टकरी महिलांना गोड बोलून व विश्वासात घेऊन विविध बँका व पतसंस्थेचे कर्ज त्यांचे नावावर घेऊन स्वतः घेतले. त्या कर्जाचे हप्ते मी भरते, मला गरज आहे, इतराला कोणाला सांगू नका असे भावनिक बोलून तीने लाखो रूपये घेतले व बँकेचे हाप्ते न भरता ती पळून गेली.
तिच्या विरूद्ध गुन्हा दाखल झाला असून, तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. पण तीला अद्याप अटक झाली नाही. तीला अटक करावी व तिच्यावर अन्य गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी आज सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयासमोर मेघना कांबळे, भाग्यश्री येवले,संध्या कुलकर्णी, छाया यादव , अर्चना लोकरे,सुजाता चोरमुले
,शुभांगी वैकर , राजश्री गवऴी ,पुनम खोले ,संगिता वनारसे,अस्मिता जवकर, अश्विनी सावंत,साधना काळे या अन्यायग्रस्त महिलांनी अमरण उपोषण सुरू केले होते.
सायंकाळी चार वाजता प्रभारी तहसिलदार विजयकुमार जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिठू जगदाळे हे उपोषणस्थळी आले. त्यांनी उपोषणकर्त्या महिलांबरोबर चर्चा केली. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.जगदाळे यांनी याबाबतचा घटणाक्रम व केलेला तपासाची माहिती दिली. भालेराव हीला अटकपूर्व जामीन मंजूर होऊ नये यासाठी पोलीसांनी केलेले प्रयत्न सांगितले. संशयित आरोपीस लवकरच अटक करू असे आश्वासन दिले. त्यानंतर तहसिलदार जाधव यांनी पंधरा दिवस पोलीसांना संधी देऊ ,तोपर्यंत तुम्ही उपोषण स्थगित करा असे आवाहन केले. त्यानंतर छाया यादव व भाग्यश्री येवले या महिलांनी सदरचे आंदोलन तुर्त स्थगित करत असल्याचे जाहीर केले.





