"परखड व्यक्तीमत्व हरपले"...! - Saptahik Sandesh

“परखड व्यक्तीमत्व हरपले”…!

माझे सहकारी ॲड.अकाश मंगवडे यांचा आज (ता.६) सकाळीच फोन आला व त्यांनी ॲड.आजिनाथ शिंदे गेल्याचे सांगितले, आणि धक्का बसला.ॲड शिंदे हे करमाळा येथील न्यायालयातील वकीलसंघाचे माजी अध्यक्ष व आमचे सहकारी म्हणून कार्यरत होते.

“लहानपणापासून ॲड.शिंदे चळवळीत कार्यरत होते. त्यांचा जन्म, बालपण व प्राथमिक शिक्षण कामोणे (ता.करमाळा) येथे झाले तर माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण करमाळा येथे झाले. वकीलीचे शिक्षण पुणे येथे झाले. घरची आर्थिक स्थिती इतकी चांगली नसतानाही ते कमवा-शिका योजनेत कार्यरत राहून ‘छात्रभारती’ची चळवळ चालवत होते.”

राज्य पातळीवरील पद घेऊन ते कार्यरत होते. करमाळा येथे राज्य पातळीवरील मेळावा घेऊन राज्यातील मान्यवर वक्ते व सामाजिक कार्यकर्ते यांना त्यांनी आमंत्रित केले होते. छात्रभारतीमुळे त्यांचे मित्र राज्यातील होते. त्यातूनच पुढे आमदार कपिल पाटील यांच्याबरोबर ते कार्यरत होते. आमदार पाटील यांच्या लोकभारती पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी करमाळा विधानसभा निवडणुकीतही भाग घेतला होते. स्पष्ट वक्ते म्हणून ते परीचीत होते.

अलीकडे ते आमदार संजयमामा शिंदे यांच्यासोबत काम करत होते. काल (ता.5) सायंकाळपर्यंत त्यांनी करमाळ्याच्या न्यायालयात कामकाज केले. वकीली व नोटरी म्हणून ते कार्यरत होते. तालुक्यातील समाजवादी विशेषतः समाजाबद्दल तळमळ असणारे नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या बरोबर चांगले जमत होते. त्यांनी जिव्हाळा ग्रुप काढला होता. तालुक्यातील भ्रष्टाचारी व्यक्तीबद्दल त्यांना चिड होती. पदाधिकारी व अधिकारी निर्ष्क्रीय असतील तर त्यांना महत्त्व दिलेले बिलकुल आवडत नव्हते. वकीलसंघामध्ये ते अनेक विषयावर परखडपणे विचार व्यक्त करत असत, विशेष ते कोणालाही घाबरत नव्हते. तत्वासाठी लढणारा एक लढवय्या हरपला.

ॲड.आदिनाथ शिंदे यांचे अकाली जाणे हे सर्वांच्याच जिव्हारी लागले. त्यांच्या परिवारावर मोठे दुःख कोसळले आहेत. त्यांची दोन्ही मुले बारामती येथे शिक्षण घेत आहेत. इथे चांगले शिक्षण नाही म्हणून स्वतः त्रास सहन करून मुलांच्या भविष्याचा विचार करून परिवार बारामतीला ठेवला होते. त्यांना गावापासून तालुक्यात परिवर्तन घडवून आणायचे होते. पण नियतीपुढे कोणाचेच चालत नाही. ॲड.शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!