शिक्षणाचा दीप विझला — शिक्षणमहर्षी मारुती पारखे यांचे निधन

केम(संजय जाधव): केम येथील शिक्षण महर्षी मारुती पारखे (वय ६५) यांचे दिनांक १८ ऑक्टोबरला हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पारखे यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक म्हणून कारकिर्दीस सुरुवात केली. पुढे पदोन्नती मिळवत त्यांनी बँक निरीक्षक म्हणून काम पाहिले. नोकरी सांभाळताना त्यांनी शिक्षणाची धुरा खांद्यावर घेत गोर-गरिब, दलित व वंचित विद्यार्थ्यांसाठी शिक्षण उपलब्ध करणे हे ध्येय ठेवले.

त्याच ध्येयातून त्यांनी केम येथे राजेश्री शिवछत्रपती युवक संघटना संचलित माध्यमिक विद्यालय सुरू केले. नंतर या शाळेला ‘शारदाताई गोविंदराव पवार विद्यालय’ असे नाव देण्यात आले. त्या काळात वडशिवणे व आसपासच्या मुला-मुलींना शिक्षणासाठी केम किंवा कंदरपर्यंत एसटी नसल्याने पायी किंवा सायकलवर जावे लागत असे. ही व्यथा ओळखून पारखे यांनी वडशिवणे येथे अजितदादा पवार विद्यालय या नावाने माध्यमिक शाळा सुरू केली, ज्यातून अनेक विद्यार्थी उच्च पदांवर पोहोचले.
वडील किंवा आई नसलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये म्हणून त्यांनी ‘बालकाश्रम’ सुरू केला. रहाणे, जेवण व शिक्षणाची पूर्ण मोफत व्यवस्था केल्याने असंख्य विद्यार्थी घडले. शिक्षणाबरोबरच पारखे यांनी दुष्काळ काळात पाण्याची सोय, बहुजन समाजासाठी सतत पाठपुरावा, समाजएकतेसाठी प्रयत्न अशी अनेक सामाजिक कामे केली. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात भरून न येणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
स्व.पारखे यांच्या अंत्ययात्रेला माजी विद्यार्थी, शिक्षक, विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







 
                       
                      