सिंह आला पण गड गेला!
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काही ग्रामपंचायतीत सिंह आला पण गड गेला अशी स्थिती निर्माण झाली आहे. केम ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीवर मोहिते-पाटील समर्थक अजितदादा तळेकर यांची तळेकर यांची सत्ता होती. या निवडणुकीत सरपंच पद तळेकर गटाकडे आले आहे. असे असलेतरी सदस्यांचे बहुमत विरोधकाकडे गेले आहे. येथे १७ सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत तळेकर विरोधकांना १० जागा मिळाल्या आहेत तर तळेकर यांचेकडे अवघ्या ७ जागा मिळाल्या आहेत. सरपंच पदी मात्र सारीका कोरे या निवडून आल्या आहेत.
गौंडरे येथेही अशीच जवळपास स्थिती झालेली आहे. गौंडरे येथे विद्यमान आमदार संजयमामा शिंदे गटाच्या तारामती हनपुडे या विजयी झाल्या आहेत. पण नऊ सदस्यापैकी सहा सदस्य माजी आमदार पाटील गटाचे तर तीन सदस्य विद्यमान आमदार संजयमामा शिंदे गटाचे आहेत. त्यामुळे या दोन ग्रामपंचायतीत सरपंच पद मिळूनही काम करताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे.
कंदर येथेही पंचरंगी सरपंच पदाची निवडणूक झाली. यामध्ये उमेश इंगळे यांना ९१२, पत्रकार गणेश जगताप यांना ९२९, उध्दव भोसले यांना ७५५ तर जगताप समर्थक मौला मुलाणी यांना १२०० मते मिळाली आहेत. संतोष शिंदे यांना अवघी ७६ मते मिळाली आहेत. जगताप समर्थक मौला मुलाणी विजयी झाले असलेतरी सदस्यांचे पूर्ण बहुमत त्यांच्याबरोबर दिसून येत नाही.
चिठ्ठीवर उमेदवार विजयी… आज झालेल्या मतमोजणीत कावळवाडी येथे एका जागेसाठी चिठ्ठीवर उमेदवार निवडण्यात आला आहे. यात प्रभाग एक मध्ये तृप्ती शेजाळ व आशा शेजाळ यांना प्रत्येकी १४१ मते पडली. त्यानंतर चिठ्ठी काढली असता तृप्ती शेजाळ यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी विजयी घोषित केले आहे.