सापडलेली पर्स महिलेला सुपूर्द करताना एसटी महामंडळाचे सर्व कर्मचारी वर्ग
करमाळा (दि.१२): दहा लाख रुपयांचे दागिने असलेली हरवलेली पर्स महिलेला काही वेळातच परत मिळाली असल्याची घटना करमाळा बसस्थानकात घडली आहे. करमाळा आगारातील एसटी चालक व वाहक यांनी सापडलेली पर्स प्रामाणिकपणे परत केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आत्माराम कुंभार असे एसटी चालकाचे नाव असून जितेंद्र भोसले हे एसटीचे वाहक आहेत.
याबाबत हकीकत अशी की, मंगळवार (दि.११) रोजी दुपारी दोनच्या सुमारास प्रतिभा हनुमंत हेंद्रे (रा.बारामती) या राशीनहून करमाळ्याकडे येणाऱ्या एसटी बस मध्ये चढल्या होत्या. गाडीमध्ये जागा नसल्याने त्या ड्रायव्हरच्या केबिनमध्ये बसल्या होत्या. करमाळा येथे स्थानकात त्या उतरून खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यांच्याजवळ असलेली पर्स बसमध्येच विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी तातडीने चौकशी कक्षामध्ये ही माहिती दिली. तिथे कार्यरत असलेल्या जयकुमार कांबळे यांनी राशीनहून आलेल्या बस शोधल्या असता त्या मुंबई-करमाळा या बसमधून आल्याचे त्यांच्या लक्षात आले.
दरम्यान एसटी मधून उतरताना एसटी चालक आत्माराम कुंभार यांना एसटीच्या केबिनमध्ये एका महिलेची पर्स विसरल्याचे ध्यानात आले त्यांनी ही बाब एसटीचे वाहक जितेंद्र भोसले यांना सांगितली. या दोघांनी ही पर्स वाहतूक नियंत्रण कक्षात करण मुसळे यांच्याकडे सुपूर्द केली होती. दरम्यान कांबळे यांनी सौ. हेंद्रे यांना घेऊन वाहतूक नियंत्रण कक्षाकडे चौकशी केली . तेव्हा एक पर्स हरवले-सापडले विभागाकडे जमा असल्याचे त्यांना कळाले. तिथे जाऊन त्यांना दागिन्यांसह पर्स मिळाली व सदर महिलेने सुटकेचा निश्वास सोडला.
या घटनेनंतर करमाळा आगारप्रमुख वीरेंद्र होनराव यांनी वाहक एसटीचे चालक व वाहक या दोघांचेही कौतुक केले. अशा प्रकारे प्रामाणिकपणे मेहनत कष्ट करून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवावरच एसटी महामंडळ मार्गक्रमन करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
एसटी महामंडळाचे ब्रीद वाक्यच ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे आहे. त्यामुळे एसटीचे कर्मचारी म्हणून आम्ही प्रामाणिकपणे एसटीतील प्रवाशांना सेवा देण्याचे काम नेहमीच करत असतो. एसटीत चढ उतर करताना प्रवाशांची काळजी घेणे, एसटीमध्ये जर काही वस्तू सापडली तर हरवले-सापडले या विभागाकडे त्या वस्तू देणे आदी कामे करत असतो. आम्ही स्वाभिमान ठेवून ही सगळे कामे करत असतो त्यामुळे त्या दिवशी सापडलेल्या पर्समध्ये काय आहे हे आम्ही न पाहता हरवले-सापडले या विभागाकडे ती पर्स सुपूर्द केली. एवढे मौल्यवान दागिने असलेली पर्स महिलेला आमच्या माध्यमातून परत मिळाल्याने, आम्हालाही एक वेगळेच समाधान लाभले आहे.