‘आदिनाथ’ कारखान्याचे मशीनरी दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून लवकरच ऊस गळीतास प्रारंभ होणार – धनंजय डोंगरे..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : ‘आदिनाथ’ ही करमाळा तालुक्यातील पहिली सहकारी संस्था असून यावर हजारो लोकांचा संसार अवलंबून आहे, याची जाणीव आम्हाला आहे, तसेच ‘आदिनाथ’ कारखाना सुरू व्हावा ही तमाम सभासदांची इच्छा आहे, हा साखर कारखाना तालुक्यातील उस उत्पादक शेतकरी सभासदांचे मंदिर आहे, व या पवित्र मंदिरामध्ये आम्ही सर्वांचे सहकार्याने मिळून काम करीत आहोत, कारखान्याचे मशीनरी दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले असून लवकरच आदिनाथ कारखान्याचा उस गळीतास प्रारंभ होणार असून कोणतेही कामगार काम सोडून गेलेले नव्हते, काही जण जाणूनबुजून दिशाभूल करुन कारखाना सुरू होणार नाही, अशा अफवा सभासदांमध्ये पसरवीत आहेत त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन आदिनाथचे चेअरमन धनंजय डोंगरे यांनी केले आहे.
याबाबत पुढे बोलताना श्री.डोंगरे म्हणाले की, मागील तीन वर्ष आदिनाथ साखर कारखाना बंद असल्याने या हंगामामध्ये कारखाना चालू होणार नाही, अशी परिस्थिती असताना तालुक्यातील सर्वांच्या सहकार्यामुळे आम्ही कारखाना चालू करु शकत आहोत, यासाठी आम्हाला माजी आमदार नारायणआबा पाटील तसेच आमच्या नेत्या रश्मीदिदी बागल यांचे मार्गदर्शन लाभत आहे. ही आम्हाला अतिशय आनंद देणारी व अभिमानास्पद गोष्ट आहे असे आम्हाला वाटते व हे केवळ आम्ही शक्य करु शकलो ते आदिनाथ कारखान्याच्या हितचिंतकाच्या सहकार्याने, ही गोष्ट आम्ही विसरू शकत नाही. यामुळे अफवा पसरवणा-यांना आमची विनंती आहे की, वैयक्तिक व्देषापोटी चूकीची माहिती पसरवू नका असेही त्यांनी म्हटले आहे.