कमलाभवानी देवीच्या नवरात्र उत्सवास घटस्थापनेने सुरुवात - विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन - Saptahik Sandesh

कमलाभवानी देवीच्या नवरात्र उत्सवास घटस्थापनेने सुरुवात – विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

करमाळा येथील छायाचित्रकार अनिकेत राऊत यांनी मंदिर परिसराचे ड्रोन द्वारा घेतलेले छायाचित्र

करमाळा (दि.३) – करमाळ्याचे आराध्य दैवत आई कमलाभवानी देवीच्या नवरात्र उत्सवाची सुरुवात आज (दि.३) सकाळी आठ वाजता मंदिर समितीचे सदस्य राजेंद्र वाशिंबेकर व त्यांच्या पत्नी या दाम्पत्यांच्या हस्ते विधिवत घटस्थापनेने झाली. यावेळी सर्व पंचायतन देवस्थान मध्ये घटस्थापना करण्यात आली व देवीचा महाभिषेक करण्यात आला.

घटस्थापनेच्या दिवशी कमला भवानी देवीची मूर्ती विविध,पुष्पहार व दागिन्यांनी सजविली

यावेळी सुशील पुराणिक, रविराज पुराणिक यांनी पौराहित्य केले. यावेळी आई कमला भवानी मातेला गुलाबी रंगाचा भरदारी शालू दागिने आकर्षक हार व फुले घालून मंदिराचे पुजारी दादासाहेब पुजारी यांनी पूजा मांडली. सनई चौघडे, झांज, नगारा, संबळाच्या तालावर देवीची आरती झाली. यावेळी बापूराव पुजारी, विजय पुजारी, ओंकार पुजारी, संदीप पुजारी, सहदेव सोरटे, तुषार सोरटे, रोहित पुजारी, रत्नदिप सोरटे, प्रसाद सोरटे तसेच सर्व मानकरी सेवेकरी उपस्थित होते. पूजेच्या आरती वेळी ट्रस्टच्या सदस्या करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे, अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल पाटील, शिरीष लोणकर, सुशील राठोड आदीजन यावेळी उपस्थित होते.

कमलाभवानी देवीच्या दागिन्यांत रत्नजडित जडावांचा टोप, भालप्रदेशीची रत्नजडित सुवर्ण बिंदी, सोन्याची नथ, चिंचपेटी, बाजूबंद घरसळी माळ, पुतळ्यांची माळ जपमाळ, बोरमाळ, कमरपट्टा व साखळी, गोफयुक्त चांदीची छत्री, चुडे व कंगन यासारख्या काही दागिन्यांचा समावेश आहे. हे सर्व दागिने राजेरावरंभा निंबाळकर यांनी इसवी सन १७२७ मध्ये सुवर्णालंकार बनवले आहेत तसेच काही दागिने हे त्यांच्या वंशजांनी बनविले आहेत. कमलाभवानी देवीच्या अंगावर नवरात्र महोत्सव व यात्रेत घातले हे दागिने घातले जातात.

मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट दरवर्षीप्रमाणे माही डेकोरेटर्स गोडसे बंधू व मराठा मंदिर रेगुडे बंधू विनामूल्य करत आहेत. तसेच लाईट डेकोरेशन मंदिर ट्रस्ट मार्फत काशीद बंधू करीत आहेत. त्यांनी पूर्ण मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली आहे. आलेल्या भक्तांसाठी दर्शनासाठी दर्शन रांग तयार केली आहे. नवरात्रोत्सव निमित्ताने मंदिरातील नियोजन मंदिराच्या विश्वस्तांनी चांगले प्रकारे केले असुन यात्रेचे नियोजन श्रीदेविचामाळ ग्रामपंचायतीने केले आहे.

अन्न छत्र मंडळा मार्फत आलेल्या भक्तांना उपवासाचे पदार्थ प्रसाद म्हणून दिला जाणार आहे. भक्ताकरिता आरोग्य सुविधा उपलब्ध आहे. तसेच मंदिर परिसरात रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. तसेच अथर्वमंगल कार्यालयात आराधी मंडळा करिता गाण्यांच्या स्पर्धा देखील झोळफाउंडेशनच्या वतीने आयोजित केल्या आहेत. ‌महाअष्टमीला शुक्रवारी रात्री. ११:५५ ते पहाटे ५:१५ पर्यंत होम केला जाणार आहे. शनिवारी (दि.१२) दसरा व सिमोलंघन आहे.  करमाळयाचे तहसिलदार शिल्पा ठोकडे करमाळा पोलिस निरीक्षक विनोद घूगे यांचे यात्रेतील घडामोडींवर व नियोजनावर विशेष लक्ष असल्याची माहिती देवस्थानचे पुजारी दादासाहेब पुजारी यांनी दिली.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नवरात्रोत्सवानिमित्ताने श्री कमलाई फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये रांगोळी स्पर्धा १४ वर्ष वयोगट व खुला गट, डान्स स्पर्धा ५ ते १२ वयोगट, खुला गट, ग्रुप डान्स खुला गट भारुडाचा व सोंगाड्याचा कार्यक्रम होईल. या सर्व स्पर्धेमधील विजेत्यांना बक्षीस वितरण केले जाणार असल्याची माहिती नवरात्र महोत्सव कमलाई फेस्टिव्हलचे अध्यक्ष पै. अभिजीत कामटे यांनी दिली. खास महिला प्रेक्षकांसाठी दररोज २ पैठणी साडी बक्षीस ठेवण्यात आले असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

कमलाई फेस्टिव्हल कार्यक्रम पत्रिका
संपादन – सूरज हिरडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!