करमाळ्यात लाचलुचपत अधिकाऱ्यांनी केली कारवाई – संशयित आरोपीवर गुन्हा दाखल..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : उमरड (ता.करमाळा) येथील महसूल विभागात कार्यरत असलेल्या मंडळ अधिकाऱ्याला २५ हजाराची लाच घेताना लाचलुचपत अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. यामध्ये करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
यात हकीकत अशी कि, तक्रारदाराने ‘वारस नोंदीसाठी अर्ज केला होता, यावर उमरड येथील मंडळ अधिकारी यांनी तक्रारदाराला २५ हजाराची लाच मागितली, त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार ही लाच आज जेऊर येथे असलेल्या मंडळ अधिकारी कार्यालय येथे साकारताना संशयित आरोपीला पकडण्यात आले. या कारवाईसाठी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक शीतल जानवे यांनी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षण अधिकारी म्हणून सोलापूर येथील पोलिस उपाधीक्षक गणेश कुंभार यांनी काम पाहिले. तर पोलिस अंमलदार स्वीमराव जाधव, पोलिस नाईक अतुल घाडगे, पोलिस कॉन्स्टेबल सलीम मुल्ला, शाम सुरवसे आदींनी सापळा लावून ही कारवाई केली आहे.