नगरपरिषदेकडून घरपट्टीवरील व्याज माफ करण्याची विरोधी पक्षाची मागणी

0

करमाळा : करमाळा येथील नगर परिषद हद्दीतील घरपट्टीवरील व्याज तात्काळ रद्द करून मालमत्ता धारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते नगरसेवक प्रशांत ढाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यासंदर्भात मुख्याधिकारी सचिन तपसे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

नगरपालिकेने घरपट्टीवरील केलेली वाढ व त्यावरील व्याज ही सर्वसामान्य नागरिकांना भरणे नागरिकांसाठी आर्थिक भुर्दंड ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सध्याच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांवर आधीच विविध करांचा ताण असताना वाढीव घरपट्टी मुळे थकबाकीदारांची अडचण अधिक वाढत आहे. अनेक मध्यमवर्गीय व सर्वसामान्य कुटुंबांना ही व्याज भरणे परवडणारी बाब नसल्याने ती तात्काळ मागे घ्यावी, अशी ठाम भूमिका विरोधी पक्षाने मांडली.



माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेतील शिवसेना नगरसेवकांनी या मागणीला जाहीर पाठिंबा दर्शविला. शासनाच्या ‘अभय योजने’अंतर्गत मालमत्ता करावरील व्याज माफ करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना 50 टक्के व्याज माफ करायचा व नगर विकास खात्याअंतर्गत शंभर टक्के व्याज माफ करण्याचा अधिकार असल्याचे नमूद करून, त्याचा जीआर दिनांक 19 मे 2025 रोजी आहे त्या अधिकाराचा वापर करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.



या संदर्भातील ठराव नगरपरिषद सभागृहात मांडण्यात आल्यास शिवसेनेचे पाचही नगरसेवक त्या ठरावाच्या बाजूने मतदान करतील, असे प्रशांत ढाळे यांनी स्पष्ट केले. नागरिकांना आर्थिक दिलासा देणे हीच आपली प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक युवराज चिवटे, अश्विनी कांबळे-अब्दुले, सुवर्णा आलाट, साजेदा कुरेशी आदी उपस्थित होते. दरम्यान, घरपट्टीवरील वाढीव व्याजदराच्या निर्णयामुळे शहरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, नगरपरिषद प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!