न्यायाधिशांचा आदेश व पोलीसांची तत्परता – दीड वर्षांच्या मुलीचा आईकडे मिळाला ताबा – ‘सोगाव'(प) गावची घटना..


करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.8) : नवरा-बायकोचा वाद…. नवरा बायकोला हाकलून देतो….23 वर्षाची बायको नाविलाजाने माहेरी येते… माहेरी फक्त आई आहे…तिला वडील नाहीत…. ना कोणाचा आधार, ना आर्थिक पाठबळ…. आई मजुरीवर स्वःताचा व माहेरी आलेल्या मुलीचा कसाबसा सांभाळ करते… रविवारी 4 जुन रोजी मुलीचा नवरा अचानक सासरवाडीत येतो… पत्नीला मारहाण करून स्वतःच्याच दीड वर्षाच्या ‘आरोही’ या मुलीस पळवून नेतो….पण आजही न्यायव्यवस्था व पोलीस यंत्रणा कार्यान्वीत असल्याने या लहान मुलीचा ताबा तिच्या आईकडे मिळतो.

सोगाव (पश्चीम) येथील लक्ष्मी नगरे हिचा विवाह पळसदेव (ता.इंदापूर) येथील ज्ञानेश्वर भुई याच्याबरोबर 12/11/2020 ला झाला. संसार सुखाचा सुरू झाला.22/9/21 ला ‘आरोही’ या पहिल्या मुलीचा जन्म झाला. त्यानंतर 13/1/2023 ला ‘शरण्या’ या दुसर्‍या मुलीचा जन्म झाला. याच कारणावरून सुखी संसार तुटला. लक्ष्मीला दोन्ही मुली झाल्याने पतीने व सासरच्या मंडळीनी लक्ष्मीला दोन्ही मुलीसह हाकलून दिले.वारंवार प्रयत्न करूनही तीला नांदयला घेतले नाही. त्यामुळे तीने पतीसह सासरचे लोकाविरूध्द कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यानुसार न्यायालयात अर्ज दाखल केला.

हे समजल्यावर ज्ञानेश्वर भुई यांनी 4 जून 2023 रोजी सोगाव येथे येवून लक्ष्मी हीला मारहाण करून दीड वर्षांच्या आरोही या मुलीस मोटारसायकल वर पळवून नेले. त्यानंतर लक्ष्मी हिने अ‍ॅड.डॉ.बाबूराव हिरडे यांच्याशी संपर्क साधला, त्यानंतर अ‍ॅड.हिरडे, अ‍ॅड.अकाश मंगवडे यांनी करमाळा येथील न्यायालयात आरोही हिचा शोध घेण्याचा अर्ज न्यायाधीश श्रीमती बी.ए.भोसले यांच्यासमोर दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून न्यायाधीश भोसले यांनी ‘आरोही’चा शोध घेण्याचा आदेश दिला. न्यायालयाचा आदेश मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्यामार्गदर्शनाखाली हावलदार एस.ई.देवकर यांनी तातडीने हालचाली केल्या.

श्री.देवकर, पोलीस नाईक जी.बी.ताकभाते, पोलीस कॉन्स्टेबल जे.एम.गोरे व महिला पोलीस कॉन्स्टेबल डी.बी.मांडरे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात संपर्क करून तेथील सहकारी माहीतीसाठी घेतला.पळसदेव येथे ज्ञानेश्वर भुई याचे घरी गेले. पोलीस येत असल्याचे समजताच श्री.भुई घराबाहेर निघून गेला. अन्य प्रतिनिधिला न्यायालयाचे वाॅरंट दाखवले व पोलीसांनी आरोही ला ताब्यात घेऊन लक्ष्मीला हीच मुलगी आहे का? विचारले. तीने होकार देताच पोलीस आरोही सह न्यायालयात आले व आरोहीचा अधिकृत ताबा ‘लक्ष्मी’कडे दिला.

वकीलांनी फी तर सोडाच पण कोणताही खर्चसुध्दा घेतला नाही, न्यायाधीश साहेबांनी दिलेला आदेश व पोलीसांकडून मिळालेले सहकार्य विसरू शकत नाही, मी माझ्या मुलीसाठी वेडी झाली होते. पण तीन दिवसात माझी मुलगी मला मिळाल्याने मी आनंदी आहे.
– लक्ष्मी भुई, सोगाव (प.),ता.करमाळा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!