संस्कृती प्रि-प्रायमरी स्कूलचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न

करमाळा: आषाढी एकादशीनिमित्त करमाळा येथील संस्कृती प्रि-प्रायमरी स्कूलचा येथे विद्यार्थ्यांसाठी अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि मूल्यशिक्षणाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. शाळेतील सर्व विद्यार्थी आणि पालक वारीतील वारकऱ्यांच्या रूपात सहभागी झाले होते. पारंपरिक भगवे वेश, टाळांचा गजर, “राम कृष्ण हरि”च्या जयघोषात उत्साहात पालखी सोहळा पार पडला.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी साकारलेली संतांची वेशभूषा आणि भक्तिरसात न्हालेली सुंदर वारी. संतांच्या अभंगातून आणि शाळेतील अध्यापिकांच्या मार्गदर्शनातून मुलांना वारीचे व आषाढी एकादशीचे महत्व समजावून देण्यात आले. शाळेच्या अध्यक्षा सौ. सुमन विश्वचंद्र बडेकर, शिक्षिका सौ. विजश्री गायकवाड व तेजश्री ओतारी यांनी विद्यार्थ्यांना ‘वारी म्हणजे भक्ती, शिस्त, प्रेम व समर्पण’ या मूल्यांची जाणीव करून दिली.

त्यांनी संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांची शिकवण सोप्या भाषेत समजावून सांगून भक्तीमार्गाचे बीज मुलांच्या मनात पेरले.पालखी सोहळा हे केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नसून भाविकतेचा अनुभव देणारा अध्यात्मिक क्षण होता. प्रत्येक पालक आणि विद्यार्थी यांचा सहभाग अत्यंत भावनिक आणि आनंददायी ठरला.कार्यक्रमाचा समारोप “मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे ज्याने मुक्ती, ऐैसे द्यावे मज ज्ञान!” या अभंगाच्या साद आणि “जय हरी माऊली”च्या गजराने करण्यात आला.





