वर्षानुवर्षे प्रलंबित रस्ता होत नसल्याने धगटवाडीतील लोक झाले आक्रमक
करमाळा (दि.९) – करमाळा तालुक्यातील रावगाव येथील धगटवाडी, शेळके वस्ती, माळी वस्ती येथील नागरिकांना अजून पक्का रस्ता मिळाला नाही. पावसाळ्यात कच्या रस्त्यावर चिखल पाणी होत असल्याने दळणवळणासाठी नागरिकांना फार अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच रस्त्यावरून शाळकरी मुलांना चिखलातून प्रवास करत शाळा गाठावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांचा रोष वाढला आहे.
येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जर रस्त्याची कामे जर झाली नाहीत तर कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना या भागात फिरू देणार नाहीत, जर आलेच तर त्यांना नागरिकांचा रोष पत्करावा लागेल असा इशारा नागरिकांनी दिला आहे. जो नेता या रस्त्याची दुरूस्ती करून देईल त्याला एकमताने मतदान करण्याचा देखील मानस या लोकांनी बोलुन दाखवला.
धगटवाडी, माळी वस्ती,भुजबळ ,रासकर वस्ती येथे जाण्यासाठी पक्का रस्ता करण्याची वर्षानुवर्षे प्रलंबित मागणी आहे परंतु ती पूर्ण होत नाही त्यामुळे यावर्षी नागरिक आक्रमक झाले आहेत. जर हा रस्ता त्वरीत दुरूस्त केला नाही तर या रस्त्यावरील चिखल गोळा करून तहसील कार्यालय, बांधकाम विभाग आणि नेत्यांच्या दारात टाकु अशा ईशारा शेतकर्यांनी दिला आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष झाले तरी आम्हाला मूलभूत सुखसुविधेपासुन वंचित राहावे लागत आहे याची खंत आहे. रावगाव ग्रामपंचायतीने तात्पुरती मलमपट्टी म्हणुन या रस्त्यावर मुरुम टाकुन द्यायला तयार झाली आहे परंतु तहसीलदार ठोकडे मॅडम या मुरुम टाकायला परवानगी देत नाहीत. त्यामुळे “आई जेवायला देईना अन् बाप भिक मागुन देईना. “अशी अवस्था आम्हा सर्वसामान्य शेतकर्यांची झाली आहे. अशा भावना या भागातील प्रशांत शिंदे यांनी व्यक्त केल्या.
या प्रसंगी महेश भुजबळ, भरत धगाटे, आबा शेळके, सचिन शिंदे, आण्णा शिंदे, अशोक भुजबळ, आश्रम भुजबळ, लक्ष्मण रासकर, लहु भुजबळ, दस्तगीर शेख, सोहेल शेख, हुसेन शेख, इस्माईल शेख, पंजाब शेख, वल्ली शेख, पिंपरी शेख, साखर धगाटे, विजय धगाटे, माउली धगाटे, योगेश धगाटे शिवाजी पाडुळे, आबा पाडुळे, आदीजन यावेळी उपस्थित होते.