करमाळ्याच्या जनतेने आजवर भल्याभल्यांना पाणी पाजले -  तुम्हालाही पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही - नारायण पाटील -

करमाळ्याच्या जनतेने आजवर भल्याभल्यांना पाणी पाजले –  तुम्हालाही पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही – नारायण पाटील

0

करमाळा (दि.१०)  – करमाळा तहसील कार्यालय नवीन जागेत स्थलांतरित होऊ नये ही जनभावना असल्याने त्यांच्या भावनांचा आदर करून हे धरणे आंदोलन आम्ही करत आहोत. आम्ही या तहसील कार्यालयाचे स्थलांतरणाला विरोध करण्यासाठी शेवटपर्यंत लढणार आहोत. आमदारांचे वागणे हे “मीच येथील सर्वस्व असून मीच सांगेल ती पूर्व दिशा” अशा प्रकारचे सुरू असून करमाळ्याच्या जनतेने आजवर भल्याभल्यांना पाणी पाजलेले आहे त्यामुळे तुम्हालाही पाणी पाजल्याशिवाय जनता राहणार नाही. असा टोला माजी आमदार नारायण पाटील यांनी काल (दि.९) करमाळा येथे आयोजित धरणे आंदोलनावेळी आमदार शिंदे यांचे नाव न घेता लगावला.

करमाळा शहरातील तहसीलसह इतर महत्त्वाची कार्यालये हे करमाळा शहराजवळील मौलालीमाळ येथे गुळसडी रस्त्याजवळ स्थलांतर करण्याचे नियोजित केले असून मागील काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या नवीन तहसील कार्यालयाचे भूमिपूजन देखील करण्यात आले आहे. सध्याच्या तहसील कार्यालय परिसरात सर्व प्रकारचे कार्यालय एकाच ठिकाणी असल्यामुळे लोकांना काम करणं सोयीचं जातं परंतु काही कार्यालय इथे आणि काही दुसरीकडे असेल तर ते गैरसोयीचे ठरणार आहे. त्यामुळे याची टेंडर प्रक्रिया सुरू असून ती प्रक्रिया थांबवावी असे आवाहन माजी आमदार पाटील यांनी यावेळी केले. आमदार शिंदे हे ठेकेदारांसमवेत सामील असल्यामुळे त्यांच्या फायद्यासाठी त्यांनी हा स्थलांतरणाचा घाट घातला असल्याचे देखील ते म्हणाले.

केलेली कामे आमदारांनी समोरासमोर येऊन सांगावी

पुढे बोलताना पाटील म्हणाले, ‘तालुक्यात किती कामे झाले आहेत आणि आत्ताच एवढे पैसे कोठून आणले?  पैशांचा पत्ता नसताना फक्त उदघाटनाचा धडाका लावलेला आहे. सन्माननीय आमदारांनी केलेली कामे समोरासमोर येऊन सांगावीत. मागे चर्चा करायची आणि चुकीचे काही तरी सांगून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रकार सुरु आहे. नवीन तहसीलच्या भूमीपूजनानंतर पत्रकारांनी, कार्यकर्त्यांनी जागेबाबत जनभावना मांडल्यानंतर, जनभावनेचा आदर करून आपण ही जागा बदलू असे देखील आमदारांनी सांगितले होते, परंतु आठ दिवसात हे महाशय बदलत असतील त्यांचा हेका पुढे नेत असतील तर आम्ही या गोष्टीला शेवटपर्यंत विरोध करणार आहोत. मीच येथील सर्वस्व असून मीच सांगेल ती पूर्व दिशा असे आमदारांची वागणे सुरू आहे करमाळ्याच्या जनतेने आजवर भल्याभल्यांना पाणी पाजलेले आहे त्यामुळे तुम्हालाही पाणी पाजल्याशिवाय जनता राहणार नाही.

येणाऱ्या विधानसभेत त्यांना त्यांची जागा दाखवा

राजकारणात काम करताना मी कार्यकर्त्यांना घेऊन ग्रामपंचायत सदस्यापासून विविध पदांवर काम करत तालुक्याच्या आमदारपदापर्यंत  मी प्रामाणिकपणे काम केले असून यामध्ये कुणी जर चुकीचं काम करत असेल तर त्याला मी विरोध करणार आहे. मागच्या विधानसभेत आमदारांना चांगली संधी मिळाली होती त्या संधीचं त्यांनी सोनं केलं नाही यामध्ये सर्व सामन्यांमध्ये भांडणे लावले एखादा कार्यकर्त्यां पुढे जात असेल तर त्याचे खच्चीकरण करण्याचे काम महाशयांनी केले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत चुकीचं काम करणाऱ्या व्यक्तींना तुम्ही त्यांची जागा दाखवून द्यावी.

येणारी सत्ता आपलीच असणार आहे!

यावेळी राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार गट) तालुकाध्यक्ष संतोष वारे आपल्या भाषणात म्हणाले की,  सध्याचे तहसील कार्यालय परिसरात पोलीस स्टेशन खरेदी-विक्री रजिस्ट्री ऑफिस, तहसील कार्यालय, पंचायत समिती शिक्षण विभाग आरोग्य विभाग मोजणी विभाग बांधकाम विभाग ही सर्व कार्यालय एकाच ठिकाणी असल्यामुळे लोकांना काम करणे सोयीचे जाते. जर ही कार्यालय वेगवेगळे झाली तर लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. मला तर असे वाटते की कृषी विभाग सुद्धा याच परिसरात आणावे ज्यामुळे शेतकऱ्यांना कामे करणे सोपे जाईल. १७ एकरच्या या परिसरामध्ये फार मोठी जागा उपलब्ध असून आहे ती इमारत ठेवून सुद्धा नवीन इमारती तयार करता येतील. या नवीन तहसील कार्यालयाच्या जागेची उद्घाटन कोणीही केली असले तरी येणारी सत्ता आपलीच आहे त्यामुळे काळजी करू नका हे तहसील कार्यालय आहे त्या परिसरातच होईल असे देखील ते म्हणाले.

नवीन तहसील कार्यालयाशेजारील जमिनींना मोठा भाव येईल हा मनसुबा

नवीन स्थलांतरित होणाऱ्या तहसील कार्यालयाच्या परिसरात आमदार साहेबांच्या हितसंबंधित लोकांनी  जमिनीचे व्यवहार केल्याचे समजले आहे जर तहसील कार्यालय तिथे झाले तर या जमिनींना मोठा भाव येणार आहे. त्यामुळे हे स्थलांतरण करण्याचा मनसुबा आम्हाला यातून दिसून येत आहे. जर इथे जागा उपलब्ध नसती तर आमचं काही म्हणणं नव्हते, परंतु वैयक्तिक स्वार्थासाठी हा स्थलांतराचा घाट घातला आहे. ज्याप्रमाणे अजितदादांनी आपल्या बगलबच्यांच्या स्वार्थासाठी मोहोळचे कार्यालय अनगरला नेले त्याचप्रमाणे करमाळ्यातील कार्यालय देखील इथल्या बगलबच्यांच्या स्वार्थासाठी दुसरीकडे न्यायचे चालले आहे. सध्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयाची एकूण 17 एकर जागा असून आहे त्या इमारती सोडल्या तर पंधरा एकर जागा शिल्लक आहे त्यामुळे तहसील कार्यालय स्थलांतर न करता आहे त्याच परिसरात करावे.

देवानंद बागल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!