बोलोरोतून शेळ्यांची चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलीसांनी पकडले – गुन्हा दाखल
करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा (ता.2) : बोलोरो जीप मधून मध्यरात्रीनंतर प्रवास, विशेष म्हणजे गाडीत माणसाबरोबर शेळ्या होत्या, याचा पोलीसांना संशय आल्याने पोलीसांनी गाडी ताब्यात घेवून चौकशी केली असता त्या शेळ्या चोरीच्याच निघाल्या, पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला दरम्यान शेळ्या मालक आल्यानंतर पोलीसात त्याने फिर्याद दाखल केली आहे.
यात समाधान दादासाहेब सांगडे (वय -25, रा शेलगांव क.) यांनी फिर्यादी दिली असून, त्यात त्यांनी म्हटले कि, आमचेकडे वस्तीवर आठ शेळया व एक बोकड असून, त्यांची देखभाल माझी आई करत असते. 28 सप्टेंबरला रात्रौ 10 वा. नेहमीप्रमाणे आम्ही झोपलो असता, घराजवळ असलेले शेडमध्ये आठ शेळया व एक बोकड होते. 29 सप्टेंबर ला सकाळी 6:30 वाजता नेहमीप्रमाणे आम्ही सर्वजण उठलो त्यावेळी मी शेळयाजवळ गेलो असता तेथे मला दोन शेळया मिळून आल्या नाहीत. त्यानंतर मी, माझी पत्नी व आई असे मिळून त्याचा शोध घेवून देखील मिळून आल्या नाहीत.
त्यानंतर दुपारी 1:00 वा. आमचे गावातील अजित काटुळे यांनी माझे मोबाईलवर शेळयांचे व आरोपीचे फोटो पाठवले. त्यामधील व्हाटसअप वरील पाठवलेल्या फोटोमधील शेळया हया माझे कडील दिसत होत्या. त्यामुळे मी व राहुल कुकडे, पांडूरंग वीर असे करमाळा पोलीस ठाणेमध्ये आलो, तेथे मोकळया जागेत दोन शेळया बांधलेल्या दिसल्या. त्या माझेच होत्या. सदरच्या शेळया बोलेरो जीप क्र. MH24L8975 यामध्ये राहुल अनिल शिंदे रा.तेरखेडा, ता वाशी जि उस्मानाबाद व त्याचे सोबत असणारे अनोळखी लोक हे घेवून जात असताना पोलीसांना संशय आलेने त्यांना ताब्यात घेतल्याचे समजले, त्यामुळे माझी खात्री झाली की,याच लोकांनी माझ्या शेळ्या चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.