केम-भोगेवाडी रस्त्यावरील नाल्यातील ढिगारा काढून रेल्वे विभागाने रस्ता केला खुला
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : केम-भोगेवाडी रोडवरील नाल्याचे काम पूर्ण होऊन देखील रेल्वे विभागाने नाल्यातील मातीचा ढिगारा काढला नव्हता. त्यामुळे नागरिकांची येण्या-जाण्याची अडचण निर्माण झाली होती. याबाबत प्रहार संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर यांनी ही बाब रेल्वे विभागाच्या निदर्शनास आणून दिली व रेल्वे विभागाने याची दखल घेऊन त्वरित मातीच्या ढिगारा बाजूला काढून रस्ता खुला करून दिला.
केम-भोगेवाडी रस्त्यावरील नाल्यातील प्लास्टर चे काम रेल्वे विभागाने सुरू केले होते. यासाठी हा रस्ता बंद केला होता. त्यामुळे भोगेवाडी, बिचितकर वस्ती, देवकर वस्ती, काळे वस्ती, पठाडे वस्ती या भागातील नागरिकांना या रस्त्यावरून गावात ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्ता रेल्वेच्या कडेने करमाळा नाल्यापर्यंत केलेला होता. परंतु हा रस्ता लांब पडत होता. या नाल्याचे प्लास्टर होऊन देखील रेल्वे विभागाने बंद केलेला रस्ता हा खुला करून दिला नव्हता त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली होती. करमाळा तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष संदीप तळेकर यांनी ही बाब रेल्वे विभागाचे सेक्रेटरी ताजुद्दीन साहेबांच्या निदर्शनास आणून दिली. याची दखल घेऊन त्यांनी त्वरित रेल्वे कर्मचाऱ्याला पाठवून, या नाल्यातील मातीचा ढिगारा काढून हा रस्ता खुला करून दिला व रस्ता खुला झाला. याबद्दल संदीप तळेकर यांचे परिसरातील नागरिकांनी आभार मानले.