करमाळ्याच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या पुनर्बांधणी कामाचा झाला शुभारंभ
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या पुरातत्त्व व संग्रहालय विभागाअंतर्गत करमाळ्यातील ऐतिहासिक किल्ल्याचे संवर्धन व जतन करण्यात येणार असून या कामासाठी २ कोटी निधी मंजूर झाला आहे. या भुईकोट किल्ल्याच्या पुनर्बांधणीच्या कामाचे काल (दि.१७ जून) शुभारंभ करण्यात आला. यावेळी शहरातील विविध नागरिक तसेच या किल्ल्यासाठी विविध स्वच्छता मोहीम आखणारे ‘दुर्गसेवक करमाळकर’ या ग्रुपचे सदस्य यावेळी उपस्थित होते. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ राजेरावरंभा निंबाळकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित नागरिकांच्या हस्ते करून या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
इ.स.१७३० च्या सुमारास राजे रावरंभा निंबाळकर यांच्या काळात हा किल्ला बांधण्यात आला होता. सध्या किल्ल्याची अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे. या कामासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे मुख्य दरवाजा, किल्ल्याचे बुरुज दुरुस्ती, तटबंदीचे काम, किल्ल्याबाहेरील परिसर सुशोभीकरण करणे या किल्ल्याच्या कामासाठी निधी मंजुरी झाला असून या कामाचे काल भूमिपूजन करण्यात आले. या कामामुळे किल्ल्यास पुर्नवैभव लाभणार असून करमाळा शहराच्या विकासात आणखीन भर पडण्यास मदत होणार आहे.