केम येथे श्री विठ्ठल–रुक्मिणी यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला

केम(संजय जाधव):येथील विठ्ठल मंदिरात वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल–रुक्मिणी यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावात व वाजत-गाजत पार पडला. “सोन्याचं बाशिंग, लगीन लागत देवाचं ” असे म्हणत हा सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.

या निमित्ताने मंदिर व सभामंडपात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिराचे पुजारी दिव्या गुरव यांनी विधी व सजावटीची जबाबदारी सांभाळली. सनई-चौघड्याच्या मंगलक्षणी सभामंडपात विठ्ठल-रुक्मिणींच्या मूर्ती पाटावर प्रतिष्ठापित करण्यात आल्या. वऱ्हाडी मंडळींना अक्षता वाटप करण्यात आले.

ब्राह्मण विजय कुलकर्णी व राहुल रामदासी यांनी मंत्रोच्चार करून अंतरपाट धरला. मामा म्हणून भरत बिचितकर व नवनाथ बिचितकर यांनी परंपरेनुसार साखरपुडा व आलिंगनाचा विधी पार पाडला. त्यानंतर मंगलाष्टकांना सुरुवात झाली. ह.भ.प बोंगाळे महाराज, शिवा तात्या दौंड, विजय कुलकर्णी, ज्ञानदेव तळेकर, सुजाता सासवडे व श्रुतिका अमोल पळसे यांनी पाच मंगलाष्टके म्हटली.
सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांसाठी भरत बिचितकर यांच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली. या भक्तीमय विवाह सोहळ्याला केम व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

