“अभ्यासू व धाडसी व्यक्तिमत्व गमावले”
भालचंद्र पाठक सर करमाळा तालुक्यासाठी लाभलेलं अभ्यासू व धाडसी व्यक्तिमत्व होते.ज्यांच्या शब्दांमध्ये धार होती आणि विचारांमध्ये सर्वसामान्यांची कदर होती.त्यांच्यामध्ये त्वेषाने लढण्याची हिंमत होती.असे आदरणीय भालचंद्र पाठक सर काल (ता 23)अकस्मात सर्वांना सोडून गेले.
असं म्हटलं जातं ” ना सत्ता साथ आती है ,ना संपत्ती साथ आती है ,इन्सानियत की सनद, हर हाल मे साथ निभाती है ॥अशा पद्धतीने आयुष्यामध्ये सरांनी सत्ता आणि संपत्ती या गोष्टी कधीही पाहिल्या नाहीत केवळ सर्वसामान्यांचा प्रश्न समोर घेऊन ग्राहक पंचायत च्या माध्यमातून सर्वांना मदत करण्याच्या दृष्टीने त्यांनी आपलं आयुष्य वेचलं. शिक्षक म्हणून काम करताना ते सदैव दक्ष राहिले. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ मार्गदर्शन केलं नाही तर अडचणीला उभे राहून, त्यांच्या समस्या सोडवल्या.
आयुष्यात नुसती गुणवत्ता उपयोगी पडत नाही तर वेळेचं भान ठेवावं लागतं… ते सरांनी समजून वेळेवर काम करण्याचा कटाक्ष ठेवला होता. सरांनी आपल्या नोकरीच्या कालावधीमध्ये शाळेमध्ये विद्यार्थ्यावरती प्रेम केले,संस्कार दिले, दिशा दिली आणि स्वतःच्या पायावर उभा राहण्याचे ज्ञानही दिले. अशाच पद्धतीने शाळेचे काम शाळेत आणि शाळा संपली की समाज नावाच्या शाळेतल्या प्रत्येक माणूस नावाच्या विद्यार्थ्याच्या समस्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी आपला महत्त्वाचा वेळ दिला .सुदैवाची गोष्ट म्हणजे या सर्व कार्यासाठी त्यांच्या परिवाराची त्यांना पुरेपूर साथ होती आणि त्यामुळे या सर्व गोष्टी ते अतिशय मन लावून करत होते. खेड्यातला माणूस प्रश्न घेऊन आला की त्याचा प्रश्न समजावून घेऊन, त्याच्या प्रश्नाचे निराकरण करत असत.स्वतः अर्ज लिहिणे ,वेळ पडल्यास टाईप करून घेणे ,तो पोस्टाने पाठवून याचा खर्च स्वतः करणे आणि आलेल्या माणसाला आपल्या घरातल्या चहापासून त्याला न्याय मिळवून देण्याचं काम ते करत होते. प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या समस्या होत्या, कोणाच्या ग्रामपंचायतीच्या , कोणाच्या कुटुंबातल्या ,कधी शेजाऱ्याच्या होत्या अशा अनेक वेगवेगळ्या बाजूच्या समस्या सर केवळ ग्राहक पंचायत म्हणून काम करत नव्हते तर आलेल्या माणसाचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने वेग-वेगळ्या पद्धतीने कामकाज करत होते. म्हणूनच त्यांच्याकडे माणसांची गर्दी होती.
सरांचा क्रियाशील गोष्टीवरती मोठा विश्वास होता. ते गड किल्ल्यावर खूप प्रेम करत होते. संभाजीराव भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी करमाळा तालुक्यातील अनेक युवकांना बरोबर घेऊन अनेक मोहिमा यशस्वी पार पाडलेल्या आहेत.गेल्या दहा वर्षांपूर्वी त्यांना असाच हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यातूनही ते सही सलामत बाहेर पडले .काही दिवस त्यांनी थोडी विश्रांती घेतली पण पुन्हा ते माणसाच्या गरड्यात गुंतले आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते कार्यरत राहिले. या कार्यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारे काम करताना त्यांना कधी अडचण आली नाही. प्रचंड अभ्यास होता ,पुस्तके वाचण्याचे वेड होते. कायदा समजून घेण्याची भूमिका होती.एखाद्या निष्णात वकीलासारखी कायद्याची माहिती त्यांना होती. तालुका विधीसेवा समितीवर ते कार्यरत असताना बैठकीत त्याची जाणीव होत होती.
ज्या गोष्टी वकिलाकडे पाहिजेत त्या गोष्टी पाठक सरांकडे होत्या हे त्यांचे वेगळंपण होतं.समाजामध्ये सर्वसामान्यांसाठी एक आश्वासक आणि विश्वासक अशा पद्धतीचं ते काम करत होते.अधिकारी हे सर्वसामान्यांना आपल्या स्वार्थासाठी वेग-वेगळ्या पद्धतीचे त्रास देतात. सरांनी या सर्व गोष्टींना कायद्याच्या चाकोरेतून वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना दिलेल्या उत्तरामुळे सरांच्या बाबतीत अधिकाऱ्यामध्ये आदरयुक्त भीती होती.एम एस सी बी , कृषी विभाग ,कृषी कंपन्या, अन्य वेगवेगळ्या क्षेत्रातील फसवणाऱ्या लोकांना सरांची भिती वाटत होती.अशांना सर कधीच सोडत नव्हते.
अनेक प्रसंगी सर स्वतः कार्यालयात जात असत आणि प्रश्न सोडवत. तहसीलदार ,पोलीस कार्यालय, थोडक्यात नगरपालिकेपासून ते महसूल विभागापर्यंतच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी सर ताकतीने लढत होते. असे लढताना त्यांनी आपल्याबरोबर कार्यकर्त्यांचं एक माहोल तयार केलं होते. शेटफळ सारख्या गावातील कार्यकर्त्यांच्या ग्रुप सरांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय तत्पर झाला आहे. गजेंद्र पोळ, प्रशांत नाईकनवरे, वैभव पोळ आदी कार्यकर्ते क्रियाशील आहेत. अशाच पद्धतीने ग्रामीण भागातले वेगवेगळ्या गावातील वेगवेगळे कार्यकर्ते सरांनी उभे केले आहेत. भिष्माचार्य चांदणे सर,अॅड.शशिकांत नरोटे , सचिन साखरे, विजय देशपांडे , संजय हांडे, डाॅ.जयंत कापडी, चंद्रशेखर जोगळेकर , बंडू कुलकर्णी, अभय पुराणिक, सारंग पुराणिक, परमेश्वर भोगल, चंद्रकांत पाटील सर, काका शिंदे सर, कांबळे सर, शिवाजी वीर, संभाजी कोळेकर, सदाशिव जाधव, पत्रकार विशाल घोलप, अश्पाक सय्यद,अशी जी अनेक मंडळी आहेत ही मंडळी सरांच्या सोबत उभी राहिली. आता सरांचं कार्य चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन ठेपलेली आहे .
ज्ञानेश्वर माऊलीने एका ओवी मध्ये म्हटलेलं आहे ,,परी राया रंका पार। धरू मेहनती सानिया थोर। कडसणी करू एक सर ।आनंदाचे आवरू॥ याप्रमाणे श्रीमंत-गरीब किंवा सत्ताधारी-सर्वसामान्य असा कोणताही भेद न मानता गरजवंताला ते मदत करत होते अशा स्वरूपामध्ये त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत ग्राहकांच्या माध्यमातून काम केले. एवढेच नाही तर आमच्या व्यसनमुक्तीसाठी सर कायम आमच्याबरोबर असत, अंधश्रद्धा निर्मूलनसाठी व्ही.आर. गायकवाड यांच्यासोबत असत, एवढेच काय पण वेगवेगळ्या महिला आंदोलनामध्ये ,वैचारिक आंदोलनामध्ये सर सहभागी होत असत. दिशा देत असत अनेक वेगवेगळे कार्यक्रम केले की जे कार्यक्रम “भूतो न भविष्यती “असे घडून आणलेले आहेत. ही त्यांच्याकडे एक वेगळी कला होती. अशा स्वरूपामध्ये त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत ग्राहकांच्या माध्यमातून काम केले. एवढेच नाही तर आमच्या व्यसनमुक्तीसाठी सर कायम आमच्याबरोबर असत अंधश्रद्धा निर्मूलनसाठी व्ही.आर. गायकवाड यांच्यासोबत असत एवढेच काय पण वेगवेगळ्या महिला आंदोलनामध्ये ,वैचारिक आंदोलनामध्ये सर सहभागी होत असत. दिशा देत असत अनेक वेगवेगळे कार्यक्रम की जे कार्यक्रम “भूतो न भविष्यती “असे सरांनी घडून आणलेले आहेत. महिलमध्ये जागृती करून अनेक कार्यक्रम घडवून आणले आहेत. महिलादिनावेळी हजारो महिलांना एकत्र करून मेळावा घडवला. भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. गॅस बाबत प्रबोधन शिबीर, ड्रायव्हिंग लायसन्स शिबीर, महिला वैचारिक चार्तुमास , क्षेत्र भेटी, आरोग्य शिबीर असे उपक्रम राबवले. त्यातूनच माधुरी परदेशी,निलीम पुंडे,रेखा परदेशी, सारीका पुराणिक, ललिता वांगडे, मंजरी जोशी, निशिगंधा शेंडे ,सुलभा पाटील, अशा महिला कार्यकर्त्यां घडल्या आहेत.,
सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची ,व्यक्तिगत गुण शोधण्याची आणि त्या गुणातून त्यांना काम देण्याची त्यांच्याकडे वेगळेपण होते. ते एक वेगळ्या प्रकारचं कौशल्य त्यांच्याकडे होते. या माध्यमातून या शहरांमध्ये, या तालुक्यामध्ये, नव्हेतर जिल्ह्यामध्ये एक वेगळा कार्याचा माहोल सरांच्या कार्य कर्तृत्वांतून निर्माण झालेला आहे. खरंतर सरांचं जाणं हे कुणालाच न रुचणार आहे. क्रियाशील व्यक्ती जाण ही सर्वात मोठी हाणी आहे. ” म्हणतात मृत्यूवर कोणालाच विजय मिळवता येत नाही,त्याचं कारण तो निमूटनपणे वेळा सांभाळतो आणि तो त्याचं काम नकळत सर्वांच्या परस्पर करत राहतो” .अशाच पद्धतीने या ठिकाणी सरांवरती काळानं घाव घातला. तालुक्याचे अतिशय समाजपयोगी ,प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरवलं .एक आगळा-वेगळा आणि सर्व समाजाच्या दृष्टीने दिशादर्शक माणूस आज अकस्मात आपल्यातून जाऊन समाजाचे फार मोठी हाणी झाली आहे.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!
– अॅड. डॉ. बाबूराव हिरडे, करमाळा.मो.न. 9423337480