शिवजयंती उत्सव समितीकडून केम येथील आश्रमशाळेला ‘आदर्श आश्रमशाळा’ पुरस्कार प्रदान

केम(संजय जाधव): शिवजयंती उत्सव समिती करमाळा यांच्या वतीने अभिमन्यू शिक्षण प्रसारक मंडळ, केम संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेला ‘आदर्श आश्रमशाळा’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सदर पुरस्कार शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड व डॉ. शेटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

संस्थेचे चेअरमन सुदर्शन तळेकर व संस्थेची व्यवस्थापन समिती शाळेच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देत आहेत. मुख्याध्यापक नितीन जगताप तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गही विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उत्साहाने कार्य करीत आहेत.
सदर आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबत विविध स्पर्धा, रात्र अभ्यासिका, मनःशांती प्रयोग, विविध व्यायाम तसेच आध्यात्मिक वारकरी शिक्षण दिले जाते. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्याचा प्रयत्न केला जात असल्याने शाळेच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

