इस्त्रीला आलेल्या कपड्यांमध्ये सापडलेले २२ हजार रुपये दुकानदाराने प्रामाणिकपणे केले परत
केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) : केम (ता. करमाळा) येथील इस्त्रीच्या दुकानात इस्त्रीसाठी आलेल्या कपड्यांमध्ये सापडलेले 22 हजार रुपये दुकानदाराने प्रामाणिकपणे परत केले. या घटनेनंतर दुकानदार शंकर रामचंद्र ससाणे यांचे केम परिसरातून कौतुक केले जात आहे.
या बाबतची सविस्तर माहिती अशी की, शंकर ससाणे यांचे लाँड्रीचे दुकान गांधी चौकात आहे. त्यांची परिस्थिती बेताची आहे. आश्रम शाळेचे मुख्याध्यापक विजय बिचितकर यांनी त्यांचे कपडे इस्तरी करण्यासाठी ससाणे यांच्या दुकानात टाकून गेले. इस्त्री करताना ससाणे यांना पॅन्टमध्ये पैशांचा बंडल दिसला. त्यांनी ताबडतोब बिचितकर सरांचा नंबर घेऊन काॅल केला व त्यांना ही माहिती दिली.
ते नामदेव तळेकर या सेवकाला घेऊन दुकानात आले. ससाने यानी या पॅन्ट मध्ये पैसे आहेत ते बघा असे म्हटल्यावर सरांनी हे पैसे मोजले. ते बावीस हजार रूपये होते. बिचितकर सरांनी ससाणे यांचे आभार तर मानलेच त्याच बरोबर त्यांना बक्षीस म्हणून पैसे द्यायला लागले परंतु ससाणे यांनी ते घेतले नाही. दुकानदार ससाणेंनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्ल त्यांचे केम परिसरातून कौतुक केले जात आहे. या अगोदर ही ससाणे यांनी एका ग्राहकाची कपड्यात सापडलेली सोन्याची अंगठी ग्राहकाला परत केली.
आजच्या काळात समाजात अवैध मार्गाने,भ्रष्टाचाराच्या मार्गाने, ग्राहकांची लूट करून पैसे कमविणाऱ्या लोकांकडे पाहिल्यानंतर देशाचे कसे होणार असा प्रश्न पडतो. पण अजूनही या काळात प्रामाणिक लोक आहेत. प्रामाणिक मार्गाने मिळविलेला पैसाच टिकतो अशा विचाराने चालणारी माणसे आहेत म्हणून आपला देश सुरळीत पणे चालू आहे. – विजय बिचितकर,केम