जावयाने सासरवाडीचे धान्य पेटवले
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : आपल्या पत्नीला नांदावयास का पाठवत नाही, या कारणावरून निंभोरे येथील जावई व त्याच्या नातेवाईकांनी सासरवाडीच्या घरातील अन्न-धान्य पेटवून दिले. हा प्रकार १२ मार्चला रात्री एकच्या सुमारास घडला आहे. या प्रकरणी सुमन मुकूंद भोसले रा.निंभोरे या महिलेने फिर्याद दिली आहे.
त्यात तिने म्हटले आहे, की माझी मुलगी लक्ष्मी हिचे लग्न अकोणी, ता. कर्जत येथील बाक्या बंड्या काळे याच्याबरोबर झाले. परंतु गेल्या सहा वर्षापासून तिचे व नवऱ्याचे पटत नसल्याने ती माहेरी राहत आहे. याचा राग धरून १२ मार्च ला रात्री एक वाजता बाक्या बंड्या काळे तसेच लखन जिगर काळे रा. दहिगाव, गोट्या बंड्या काळे व नान्या बंड्या काळे दोघे रा. अकोणी, ता. कर्जत यांनी आमच्या घरासमोर ठेवलेले ज्वारी व गव्हाची पोती त्यावर रॉकेल टाकून पेटवून दिली आहे. या प्रकरणी पोलीसांनी चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास विनायक माहुरकर हे करत आहेत.