रिक्षाचालकाचा मुलगा घेणार 'आयआयटीत' शिक्षण - करमाळ्यातील आश्रमशाळेत दिग्विजय जाधवचा सन्मान -

रिक्षाचालकाचा मुलगा घेणार ‘आयआयटीत’ शिक्षण – करमाळ्यातील आश्रमशाळेत दिग्विजय जाधवचा सन्मान

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : पांडे (ता.करमाळा) येथील दिग्विजय जाधव याने घरची परिस्थिती प्रतिकूल असतानाही जिद्दीने शिक्षण घेत आयआयटी मध्ये शिक्षण घेण्यासाठी असणाऱ्या प्रवेश परीक्षेत यश मिळविले आहे.

दिग्विजय जाधव हा कष्टाळू कुटुंबातील रिक्षा चालक असणारे रामहरी जाधव यांचा मुलगा असून, आयआयटी सारख्या नामांकित संस्थेतील शिक्षणासाठीच्या प्रवेश परीक्षेत पात्र झाल्यानंतर भटके विमुक्त जाती व आदिवासी ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने यांच्यावतीने एकलव्य आश्रमशाळा येथे त्याचा सन्मान करण्यात आला.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन दिग्विजयने मिळविलेले यश उल्लेखनीय आहे. असे मत सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने यांनी व्यक्त केले. तसेच आगामी काळात अभियांत्रिकी क्षेत्रासह विविध स्पर्धा परीक्षा देवून यश मिळवावे. असे आवाहन केले. याप्रसंगी ऍड. संग्राम माने, शांताराम माने, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अशोककुमार सांगळे उपस्थित होते.

दिग्विजयने जेईई ऍडव्हान्स परीक्षेत ९६ गुण प्राप्त केले आहेत. तर सीईटी परीक्षेत ९७.५५ गुण मिळवून राज्यात आठव्या क्रमांकाचे यश मिळविले आहे. त्याचे. पाचवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण पांडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले असून सहावीला नवोदय प्रवेश परीक्षेत यश मिळविल्यानंतर सहावी ते दहावी पर्यंतचे शिक्षण नवोदय विद्यालय सोलापूर येथे पूर्ण केले. तर अकरावी, बारावी शिक्षण श्री चैतन्य इन्स्टिटयूट, पुणे येथे घेत तेथेच आयआयटी प्रवेश परीक्षेची तयारी केली. त्याला स्नेहल चव्हाण, शशिकांत चौकटे, सुरेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यानच्या काळात अनेक अडचणी येत होत्या, मात्र दिग्विजय जिद्दीने शिकत राहिला आणि त्याने यश मिळविले. या काळात रिक्षा चालविणारे वडील रामहरी जाधव आणि शिवणकाम करुन कुटुंबाच्या खर्चास मदत करणारी आई रुपाली जाधव यांनी दिग्विजय यास मोठे पाठबळ दिले.

यशाच्या पार्श्वभूमीवर बोलताना दिग्विजय याने, आई वडिलांचा खूप पाठिंबा होता. शिक्षणातील फार माहिती नसूनही तू फक्त शिक, बाकी आम्ही बघतो. असे म्हणत त्यांनी मदत पुरविली. आयआयटीत कॉम्पुटर इंजिनिअरिंग करून पुन्हा स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत. माझ्या सारख्या गरीब विद्यार्थ्याना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करायचे आहेत. असे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी स्वयं प्रेरणेने शिक्षण घेतले तर यश मिळते. असेही जाधव याने स्पष्ट केले.यावेळी शिक्षक भास्कर वाळुंजकर, किशोरकुमार शिंदे, विलास कलाल, विद्या पाटील, विठ्ठल जाधव, कुमार पाटील, प्रल्हाद राऊत, अधीक्षक बाळासाहेब शिंदे, उमेश गायकवाड, सैदास काळे, कविराज माने, दिपाली माने आदिसह कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

कौतुकास्पद यश…  दिग्विजय जाधवची कौटुंबिक परिस्थिती प्रतिकूल आहे. मात्र दिग्विजयने सातत्याने अभ्यास करुन आयआयटी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. ही कौतुकास्पद बाब आहे. गुणवंत मुलांना सतत पाठबळ देत असताना आगामी काळातही सहकार्य केले जाईल. – रामकृष्ण माने, सामाजिक कार्यकर्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!