वर्गात खाली पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

करमाळा(दि. २५): कंदर (ता. करमाळा)
येथील रहिवासी असलेला स्वप्नील मन्मथ शिंदे (वय – १६) या विद्यार्थ्याचा वर्गात जाताना खाली पडून बेशुध्द होऊन जागीच मृत्यू झाला आहे. हा प्रकार काल (ता.२४) दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडलेला आहे.

स्वप्नील शिंदे हा रयत शिक्षण संस्थेच्या टेंभूर्णी येथील न्यु इंग्लीश स्कुल मधील दहावीच्या वर्गातील विद्यार्थी होता. नेहमीप्रमाणे दुपारी २ वा. ५० मि. लहान सुट्टी होऊन ३ वा. १० मि. शाळा भरण्याची वेळ झाली. मुले वर्गात जात होती. स्वप्नील वर्गात जाताना पहिल्या मजल्यावरील जिन्यासमोर अचानक खाली कोसळला व बेशुध्द झाला.

मुख्याध्यापकांनी स्वप्नीलला त्वरीत खासगी रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून स्वप्नील मृत झाल्याचे सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर स्वप्नीलचे प्रेत त्याच्या कुटूंबाच्या ताब्यात देण्यात आले.
स्वप्नील हा मन्मथ शिंदे यांना एकुलता एक मुलगा होता. त्यांना लहान दोन मुली आहेत. स्वप्नीलचे आजोबा अर्जुन शिंदे हे कीर्तनकार असून स्वप्नील स्वतः पखवाज वादक होता. लहान वयातच त्याच्या आकस्मात निधनाबद्दल कंदर व परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

