कष्टाच्या घामानं आयुष्याचं केलं सोनं ... -

कष्टाच्या घामानं आयुष्याचं केलं सोनं …

0

कष्टाच्या घामानं आयुष्याचं केलं सोनं …
असं म्हणतात…
“जो संकटांना हसत सामोरा जातो, तोच आयुष्याचं सोनं करतो… घामाचा प्रत्येक थेंब जेव्हा भूमीत सांडतो, तेव्हाच यशाचा सूर्य उगवतो…” या ओळी म्हणजे स्वतःचा मार्ग स्वतः शोधणाऱ्या ,एका सामान्य मजुराने मिळवलेल्या यशाचे गुपीत सांगणाऱ्या आहेत. परिस्थितीने माणूस घडत जातो आणि त्या परिस्थितीवर मात करत तो आपलं भविष्य घडवतो, याच विचाराचा सुंदर जीवनप्रवास आहे, तो खातगाव येथील राजेंद्र नारायण रणसिंग यांचा…

राजेंद्र रणसिंग यांचा जन्म १ नोव्हेंबर १९६४ रोजी खातगाव या भूमीत झाला. तेव्हा खातगाव एकच होतं; पण उजनी धरण बांधल्यानंतर ते तीन भागात विभागलं गेलं. बालपणापासूनच त्यांना गरिबीला
सामोरे जावे लागले. त्यांची शिक्षणाची ठिकाणे पाहीले की समजेल. खातगाव, पळसदेव, डाळज, केत्तूर नं.2, इथपर्यंत प्राथमिक व माध्यमिक पुर्ण झाले. बार्शी ला उच्च माध्यमिक, त्यानंतर इंदापूर ला 1986 ला बी.काॅम.पुर्ण झाले.या काळात त्यांनी पडेल ती कामे केली.जनावरे राखणे, रतीबाचे दुध घालणे, शेतात कामे करणे, रोजगार हमी कामावर जाणे, पाईपलाईन च्या चार्या खोदणे, लोकांच्या शेतात ऊसाची लागवड करणे अशी कामे केली. परिस्थितीने त्यांना आडवले पण कोणतीही तक्रार न करता त्यावर त्यांनी मात केली.

सन १९८७ मध्ये एम.कॉम.चे शिक्षण नगर येथे सुरू केले पण घरची आर्थिक परिस्थिती इतकी हलाखीची होती की शिक्षण चालू ठेवणं कठीण झालं.
आहे त्या शिक्षणावर नोकरी मिळत नव्हती, त्यामुळे त्यांना, त्यांचे मोठे बंधु जालिंदर (भाऊ) व छोटे बंधु लालासाहेब या सर्वांनाच कष्टाची कामे करावी लागत होती.
सन १९८८ मध्ये या परिवाराला एक वेगळे वळण मिळाले. पंचायत समितीचे माजी उपसभापती रामकृष्ण उर्फ(पोपटराव) पाटील यांनी त्यांच्या कष्टाळूपणाची आणि स्वभावाची दखल घेतली. त्यांनी तत्कालीन जिल्हा परिषदेचे सदस्य व जिल्हा परिषदेचे सल्लागार ॲड.बी.जे.गोमे साहेब यांच्याकडे राजेंद्र ची ‘नोकरी लावा व जावाई करा’ अशी शिफारस केली. त्यातून 2 मे 1988 ला श्री. रणसिंग यांना सोलापूर जिल्हा बँकेत क्लार्क म्हणून नोकरी मिळाली व जेऊर येथे नेमणूक झाली.आयुष्याला एक नवी दिशा मिळाली. पुढे ८ मे १९८९ ला गोमे साहेबांची कन्या सिंधुताई यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला आणि त्यांना उत्तम जिवनसाथी लाभला.

जिल्हा बँकेत जेऊर, करमाळा, चिखलठाण, टाकळी आणि अखेरीस जिल्हा बँकेच्या सोलापूर कार्यालयात प्रशासन अधिकारी म्हणून नेमणूक झाली. ३७ वर्षांनंतर ते सेवानिवृत्त झाले. हा प्रवास म्हणजे कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि माणुसकीचा दस्तऐवज म्हणावा लागेल. पदावर राहूनही माणुसकी जपणं सोपं नसतं पण श्री. रणसिंग यांनी ते केलं.पद नव्हे, माणुसकीने कमावलेला मान मोठा असतो, हे त्यांनी बँकेच्या ग्राहकांना स्व:ताच्या कृतीतून दाखवून दिले. “

राजेंद्र रणसिंग यांनी केवळ नोकरीच केली नाही तर , शेतीतही आदर्श निर्माण केला. एकेकाळी १८ एकर जिरायत शेती असणाऱ्या रणसिंग परिवाराने त्यांच्या पुढाकारातून साडेबहात्तर एकर शेती खरेदी करून ती बागायत केली आहे. केळी, ऊस,पपई, डाळिंब, दोडका अशी विविध पिकं घेऊन त्यांनी शेतीला उत्पादनक्षम आणि नफादायक केलं. मेहनत आणि नियोजन यांच्या संगमातून त्यांनी जमिनीतून अक्षरश: सोनं पिकवलं व आजही पीकवत आहेत.
याबरोबरच संपुर्ण रणसिंग परिवार एकत्र ठेवून त्यांनी एकतेचा आदर्श निर्माण केला. आज रणसिंग परिवार एकत्र, सुसंवादी आणि संपन्न आहे. त्यांची मोठी कन्या सौ.नूतन संतोष महाडीक या उच्चशिक्षित असून, त्यांचे मोठे जावई संतोष महाडीक हे एक आदर्श शिक्षक असून जिल्हा परिषदेच्या शाळेत आहेत.छोटी मुलगी नम्रता ही एम.ए.,एम.एस.डब्ल्यू. असून राज्यात टॉपर ठरली आहे.तसेच ती sndt विद्यापीठ ची गोल्ड मेडलिस्टआहे,एकाच वेळी आठ जागांवर अधिकारी म्हणून तीची निवड झाली एवढेच नव्हेतर तीची क्लास वनसाठी मुलाखत झाली आहे आणि अजून एका पदासाठी मुलाखत पात्र आहे. सध्या अलिबाग येथे समाजकल्याण विभागात समाजसेवा अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. पुतणी डॉक्टर केली तर पुतण्या सी. ए. करतोय, आपल्य भावाच्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देत त्यांनी संपूर्ण परिवार उभा केला.

सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. ग्रामसुधार समिती, बुद्धिबळ संघ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, आणि इतर विविध सामाजिक चळवळींमध्ये ते सक्रिय आहेत. त्यांनी नम्र व मनमिळाऊ स्वभावाने अनेक मित्र जोडले आहेत. तसेच त्यांची आदर्श पत्नी भावजया, सूना, पुतणे यांचेही त्यांना या प्रगतीमध्ये अतिशय मोलाचे सहकार्य लाभले.

आज १ नोव्हेंबर २०२५ रोजी एकसष्ठी निमित्त सायं. ४ वाजता खातगाव येथे त्यांचा वाढदिवसाचा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा केवळ वाढदिवस नाही, तर एका प्रामाणिक आणि प्रेरणादायी जीवनप्रवासाचा सन्मान आहे.

आपण यावेळी उपस्थित रहावे ही विनंती..

“मा. राजेंद्र रणसिंग साहेब…
आपला प्रत्येक दिवस सूर्यकिरणासारखा प्रकाशमय होवो…,
आपले प्रत्येक पाऊल प्रेरणादायी पडो…
जीवनाचा प्रत्येक क्षण सुगंधी फुलासारखा फुलत राहो …”
एकसष्ठी निमित्त पांडुरंग चरणी हीच प्रार्थना ….
६१व्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक खुप खुप शुभेच्छा! 🎂🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!