शिक्षक हा फक्त गतीच नव्हे तर योग्य दिशा देणारा दीपस्तंभ-डॉ. हिरडे.

करमाळा(ता.५): शिक्षक हा समाजाला फक्त गतीच नव्हे तर योग्य दिशा देणारा दीपस्तंभ असतो. देशाचे भवितव्य घडवण्याचे काम शिक्षक करत असतो. शिक्षक म्हणजे पवित्र काम करणारा देवदूत असतो. शिक्षकाची गरज काल होती, आज आहे व उद्याही राहणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी अपडेट रहाणे गरजेचे आहे. या शाळेला महाडिक सरासारखे शिक्षक लाभले हे महत्वाचे आहे.त्यांच्या कार्याचा वारसा पुढील शिक्षकांनी चालवावा, असे अवाहन डाॅ.ॲड.बाबूराव हिरडे यांनी केले.


कोर्टी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत शिक्षक श्री. संतोष महाडिक यांच्या बदलीनिमित्त सदिच्छा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पाहुणे म्हणून ॲड.हिरडे बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्हा सहकारी बँकेचे सेवानिवृत्त प्रथम श्रेणी अधिकारी राजेंद्र रणसिंग हे ही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप काका शेरे हे होते.

यावेळी बोलताना श्री. रणसिंग म्हणाले, की महाडिक सरांसारखा मला आदर्श जावई लाभला असून माझे कन्यादान सतपात्र झाले आहे. शांत, संयम व कष्ट या तिन्ही बाबी एकत्र रहात नाहीत, पण महाडिक सरांकडे त्या आहेत. त्यांची अशीच प्रगती होत जावो, हीच सदिच्छा! विद्यार्थ्यांपैकी पृथ्वीराज मेहेर, विराज साळवे आणि शौर्य चव्हाण यांनी मनोगते व्यक्त केले.

यावेळी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्री. महाडिक व सौ. नुतन महाडिक यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिंदे आणि त्यांचे शिक्षक सहकारी, श्रीरंग मेहेर, उपसरपंच नानासाहेब झाकणे,. कबड्डी प्रशिक्षक नवनाथ माने यांनी खेळाडूंसह ज्ञानसागर क्लासेस’चे शिंदे सर आणि त्यांचे सहकारी यांनीही महाडिक सरांचा सन्मान केला.

यावेळी गावातील मान्यवर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. याशिवाय रणसिंग परिवारातील सदस्य, माजी शिक्षिका श्रीमती बहिर, तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. पालक प्रतिनिधी म्हणून चंद्रकांत क्षीरसागर, अंकुश अभंग, सुरेश दादा चव्हाण, संदीप चव्हाण आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री. शहाणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपशिक्षिका श्रीमती साळुंखे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.



