करमाळा शहरातील एमआयडीसीमध्ये साडेतीन लाखाची चोरी..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरातील एमआयडीसीत जीन्यातून घरात प्रवेश करून चोरट्यांनी लोखंडी कपाटातून रोख रक्कम ४९ हजार रूपये व उर्वरित सोन्याच्या वस्तू अशी एकूण ३ लाख ४१ हजार ५०० रूपयाची चोरी झाली आहे. हा प्रकार २ सप्टेंबरच्या मध्यरात्री घडला आहे. या प्रकरणी डॉ.विक्रम महादेव कारंडे (रा. एमआयडीसी करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की आम्ही एमआयडीसीतील प्लॉट नं. २० मध्ये राहत असून २ सप्टेंबरला सायंकाळी जेवण करून झोपलो. त्यावेळी जीन्याच्या दरवाजाची आतील कडी लावण्याचे राहुन गेले होते. त्यानंतर मध्यरात्री त्या जीन्यातून चोरट्यांनी घरात प्रवेश करून बेडरूम मधील असलेल्या कपाटाचा दरवाजा उघडून ८० हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या दोन पाटल्या, ४५ हजार रूपयाची सोन्याची अंगठी, ६७ हजार ५०० रूपयाचे कानातील सोन्याची फुले व ४९ हजार रूपये रोख असे ३ लाख ४१ हजार ५०० रूपयाचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.