देशी गाईचे अनोखे डोहाळे जेवण, वांगी परिसरात ठरला चर्चेचा विषय - Saptahik Sandesh

देशी गाईचे अनोखे डोहाळे जेवण, वांगी परिसरात ठरला चर्चेचा विषय

करमाळा (सूरज हिरडे): हौसेला मोल नसते. कृषी संस्कृती जपणाऱ्या भारतात बळीराजा आपल्या परिवाराचीच नाही तर कृषीसाठी लागणाऱ्या सर्व घटकांची काळजी घेत असतो. याचाच प्रत्यय आलेला आहे. करमाळा  तालुक्यातील वांगी २ येथील शेतकरी रमेश महादेव पन्हाळकर यांनी कृषी संस्कृतीचा महत्वाचा घटक असलेल्या आपल्या गाईचे डोहाळे जेवण अगदी मुलीच्या डोहाळे जेवणासारखे थाटामाटात केले आहे. या अनोख्या डोहाळ जेवणासाठी संपूर्ण गावासह पै पाहुण्यांनीही हजेरी लावली होती. देशी गाईबद्दल आदर व्यक्त करणाऱ्या या अनोख्या डोहाळ जेवणाचा वांगी पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला.

डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाची पत्रिका देखील तयार करून लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. ३५० पेक्षा जास्त लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमापुर्वी गाईला सजवण्यात आले. तिच्या अंगावर झूल टाकण्यात आली. तिची शिंगे रंगवली गेली. गोंडे, गळ्यात घुंगुरमाळा, पायात तोडे घातले गेले. गाईसाठी स्वतंत्र मंडप घालण्यात आला.

गाईसाठी हिरव्या-सुक्या चाऱ्यासह, फळे व इतर अनेक पदार्थांनी डोहाळ जेवणाची रंगत वाढवली. महिलांनी गाईला पंचारतीने ओवाळून पूजन केले. अनेकांनी तिला गोग्रास भरवला. तिचे ओटीपूजन झाले. आलेल्या लोकांसोबत फोटोसेशनही झाले. सर्व कार्यक्रम झाल्यानंतर उपस्थित सर्व पाहुण्यांना जेवण पन्हाळकर कुटुंबांकडून देण्यात आले.

पन्हाळकर कुटुंबाकडे वडिलोपार्जित गुरे सांभाळली जात आहेत. डोहाळे जेवण केलेली ही गाय खिलार प्रजातीची गाय असून या गायीचा जन्म ३ वर्षांपूर्वी त्यांच्या गोठ्यात झाला आहे. या गायीबद्दल पहिल्यापासूनच पन्हाळकर परिवाराला लळा आहे. ही गाय पहिल्यांदाच व्ययणार असल्याने या गाईवरील प्रेमापोटी त्यांनी हे डोहाळे जेवण करण्याचे ठरविले आहे. याआधी असे डोहाळे जेवण झाल्याचे त्यांनी एका बातमीमध्ये पाहिले होते. त्यावरूनच त्यांना ही कल्पना सुचली असल्याचे रमेश पन्हाळकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!