“महसूल पथकाच्या ताब्यातील ट्रॅक्टरच लंपास – बेकायदेशीर मुरूम वाहतुकीचा प्रकार उघड”

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.४: कात्रज परिसरात बेकायदेशीर मुरूम उत्खनन व वाहतुकीवर कारवाई करताना महसूल पथकाच्या ताब्यात दिलेला ट्रॅक्टरच चालकाने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आकाश हणुमंत खांडेकर (रा. कोंढार चिंचोली, ता. करमाळा) याच्याविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात प्रबुद्ध हरिदास माने (वय ५०, ग्राम महसूल अधिकारी – तलाठी, कात्रज ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे.त्यात त्यांनी म्हटले, की दि. २५ मार्च रोजी सायंकाळी उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड यांनी टाकळी ते कोंढार चिंचोली मार्गावर बेकायदेशीररीत्या मुरूम वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर पकडला होता. या कारवाईनंतर संबंधित ट्रॅक्टर व त्यास जोडलेल्या तीन ट्रॉली महसूल पथकाच्या ताब्यात देण्यात आल्या.

त्यानंतर तलाठी प्रबुद्ध माने, कात्रजचे कोतवाल रहिम तांबोळी, तलाठी संजय शेटे व पोलीस पाटील सोमनाथ पाटील यांनी घटनास्थळी पंचनामा केला. लाल रंगाचा, विना नंबरचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व त्यास जोडलेल्या तीन ट्रॉली मुरमाने भरलेल्या अवस्थेत आढळून आल्या. चौकशीदरम्यान चालक आकाश खांडेकर याने ट्रॅक्टर व ट्रॉली स्वतःची असल्याचे कबूल केले, मात्र मुरूम उत्खनन व वाहतुकीसाठी कोणताही शासकीय परवाना नसल्याचे स्पष्ट केले.
पंचनामा पूर्ण केल्यानंतर संबंधित ट्रॅक्टर व ट्रॉली तहसील कार्यालय, करमाळा येथे आणण्याचे आदेश देण्यात आले. मात्र महसूल पथकातील कोणालाही ट्रॅक्टर चालवता येत नसल्याने चालक आकाश खांडेकर यालाच वाहन चालवून तहसील कार्यालयात येण्यास सांगण्यात आले. महसूल पथक त्याच्या मागोमाग जात असताना, खांडेकर याने करमाळ्याकडे न जाता छुप्या मार्गाने ट्रॅक्टरसह पलायन केल्याची घटना घडली.

सायंकाळी सुमारे ७:४५ वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर महसूल पथकाने परिसरात तसेच आरोपीच्या घरी शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ माहिती देण्यात आली.
या घटनेत सुमारे ५ लाख १३ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये ३ लाख रुपये किंमतीचा ट्रॅक्टर, २ लाख १० हजार रुपये किमतीच्या तीन ट्रॉली आणि सुमारे ३ हजार ६०० रुपये किमतीचा मुरूम यांचा समावेश आहे. सदर प्रकरणात आरोपीने कोणतीही शासकीय परवानगी न घेता मुरूम उत्खनन करून पर्यावरणाचा ऱ्हास केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच महसूल पथकाच्या ताब्यातील वाहनच चोरून नेल्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. तहसीलदारांच्या आदेशानुसार संबंधित आरोपीविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

