उजनीतून जामखेडला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या कामाला सुरवात – पोथरे परिसरात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – उजनी धरणावरून जामखेड शहरासाठी पाणी आणण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुवात झालेली असून सदर योजनेसाठी लागणाऱ्या पाणी वहनाच्या नळ्या पोथरे (ता.करमाळा) परिसरात ट्रकद्वारे आणण्यात आल्या असून रस्त्यालगत चारीमध्ये पाईपलाईन टाकण्यास सुरवात झाली आहे.

सदर योजना ही १७९ कोटी ९८ लाख रुपये खर्चाची असून दहिगाव (ता. करमाळा) ते जामखेड अशी सुमारे ६६.२५ किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. यात डीआय के-९ हा ५०० एमएम व्यासाचा पाईप वापरण्यात येणार असून असा पाईप घेऊन ट्रक्स पोथरे परिसरात मागील ४-५ दिवसांपासून येत आहेत. ही सर्व पाईपलाईन भूमिगत असणार आहे. करमाळा तालुक्यातुन ही पाईपलाईन पोथरे परिसरातुन सुरू केली आहे. रस्त्यालगत असलेल्या चारीत पाईप टाकण्यास सुरवात झाली आहे. पाईपलाईन द्वारा नेलेले पाणी जामखेड शहरात पाच ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या टाक्यांमध्ये सोडले जाणार असून त्या टाक्यांमधून शहरातील घराघरात पाणी पोहोचेल.

जामखेडच्या पाण्याचा प्रश्न शाश्वत व कायम स्वरूपी सोडवण्यासाठी जानेवारी २०१९ मध्ये ४.६२५ दश लक्ष घन मीटर उजनी धरणातील पाणी आरक्षित करण्यात आले होते. त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी जामखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे सर्वेक्षण, विविध विभागांच्या परवानग्या जुलै २०१९ पर्यंत घेतल्या होत्या. २४ डिसेंबर २०१९ ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जामखेड येथे आलेल्या महाजनादेश यात्रेदरम्यान जामखेड पाणीपुरवठा योजनेच्या मंजुरीचे पत्र पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना जाहीर सभेत दिले होते. त्यावेळी या योजनेला ११७ कोटी रुपये मंजूर झाले होते. परंतु त्यानंतर २०१९ मध्ये सत्ताबदल झाल्याने ही योजना रखडली होती. त्यानंतर १ डिसेंबर २०२२ रोजी नगरविकास विभागाने या पाणीपुरवठा योजनेस १७९ कोटी ९८ लाख रुपये मंजूर केले. आता ही योजना पुन्हा सुरू झाली असून या योजनेचे काम २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मे. इगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड, ठाणे ही कंपनी यावर काम करत आहे.

नुकतेच या कामाची सुरुवात झाल्यानंतर पाहणी केल्यावर विधान परिषद आमदार प्रा.राम शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, भविष्यातील २५-३० वर्षात वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून जामखेड शहरासाठी उजनीवरून ही नवीन पाणीपुरवठा योजनेची मागणी मी २०१९ मध्ये केली होती. महाजनादेश यात्रेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला तत्वतः मान्यता दिली होती. परंतु नंतर सत्ताबदल झाल्याने मी केलेल्या कामाचे श्रेय मला मिळु नये यासाठी महाविकास आघाडीने तब्बल अडीच वर्षे हे काम प्रलंबित ठेवले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यापुढे हा प्रश्न मी तातडीने मांडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीचशे कोटी रुपये या योजनेला मंजूर केले असून प्रशासकीय, तांत्रिक व इतर सर्व मंजुरी सप्टेंबर २०२३ मध्ये पूर्ण झाले व आता या कामाला वेगाने सुरवात झाली आहे. विरोधकांनी पाणीपुरवठा योजना मंजूर नसताना उद्घाटन केले. अडीच वर्षे फक्त भुलवाभुलवी केली अशी टीका आ. शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या केली.

करमाळा तालुक्यातील अनेक गावे वर्षानुवर्षे पाण्यापासून वंचितच !

उजनी धरणाच्या निर्मितीसाठी करमाळा तालुक्यातील २४ गावांचे पुनर्वसन करावे लागलेले. असे असूनही करमाळा तालुक्यातील अद्याप अनेक गावे हे उजनीच्या पाण्यापासून वर्षांनूवर्षें वंचित आहेत. यामध्ये पोथरे, कामोने, खडकी, जातेगाव, आळजापूर, बीटरगाव(श्री), रावगाव, पिंपळवाडी, बोरगाव, घारगाव आदी अनेक गावे आहेत. प्रत्यक्षात जामखेड शहर उजनी पासून बऱ्याच अंतरावर असून देखील उजनीचे पाणी जामखेडला जात आहे तर उजनी बॅकवॉटर हे करमाळा तालुक्यातील सदर गावांना जवळ असताना देखील ही गावे पाण्यापासून अद्याप वंचित आहेत. याबाबत या गावातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Ujani | Ram Shinde | Rohit Pawar | Jamkhed | ujani to Jamkhed Pani puravatha yojana | ujani Jamkhed water pipeline | उजनी ते जामखेड पाणी पुरवठा योजना | Eknath Shinde | Devendra Fadanwis | saptahik Sandesh | Pothare | Karmala | Dahigaon

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!