निदर्शने करत तहसील कचेरी स्थलांतरास बहुजन संघर्ष सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला विरोध
केम (संजय जाधव) – नूतन तहसील कार्यालयाची करमाळा शहराबाहेर निश्चित केलेली जागा ही लोकांना गैरसोयीची असल्याचे सांगत याचा निषेध म्हणून आज दि. ४ ऑक्टोबर रोजी करमाळा तहसील कार्यालयासमोर बहुजन संघर्ष सेनेच्या कार्यकर्त्यांनी भव्य निदर्शने केली.
यावेळेस बोलताना बहुजन संघर्षनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम म्हणाले की, इंग्रजांनी बांधलेल्या तहसील कचेरीचा एकही दगड अद्याप हललेला नाही पूर्ण इमारत सुस्थितीत आहे मग नवीन तहसील कचेरी बांधण्याचा निर्णय कशासाठी घेतला हा प्रश्न तालुक्यातील जनता विचारत आहे तहसील कचेरी बांधायचीच असेल तर आहे त्या ठिकाणी बांधावी. इंग्रजांनी तहसील कचेरीच्या अवतीभवती भरपूर जागा शिल्लक ठेवलेली आहे मग आज असलेल्या तहसील कचेरीच्या जागेवर नवीन तहसील कचेरी बांधावी.
तहसील कचेरी बांधणे तसे गरजेचे नव्हते तहशील कचेरी मध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे कर्मचाऱ्यांची संख्या आमदार संजय शिंदेंनी वाढवावी व तालुक्यातील जनतेची तहसील कचेरी मधील रखडलेली कामे मार्गी लावावीत दप्तर दिरंगाई होणार नाही याची दखल घ्यावी आमदार संजय शिंदे यांनी पाच वर्षांमध्ये एकदाही आमसभा घेतली नाही व तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. दोन दोन वर्षापासून शेतकऱ्यांचे प्रस्ताव तहसील कचेरीमध्ये पडून आहेत रेशन कार्ड चे संदर्भातील कामे दोन-तीन वर्षापासून पुरवठा विभागामध्ये पडून आहेत मात्र कामे लोकांची झालेली नाहीत. आमदार संजय शिंदे यांनी प्रशासनातील कामे गतिमान करण्याऐवजी तहसील कचेरीचे बांधकाम मौलाली माळावर बांधण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा घेतलेला आहे.
आज असणाऱ्या तहसील कचेरीच्या आवारामध्ये पंचायत समितीचे कार्यालय आहे, पोलीस स्टेशनचे कार्यालय आहे, भूमी अभिलेख चे कार्यालय आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आहे, संस्था निबंधकाचे कार्यालय आहे एवढ्या सोयी एकाच ठिकाणी तहसील कचेरीच्या आवारामध्ये लोकांना मिळतात शिवाय तहसील कचेरी पासून करमाळा शहरातील बाजारपेठ जवळ आहे, सरकारी दवाखाना जवळ आहे, एसटी स्टँड जवळ आहे एवढ्या सर्व सोयींनी उपलब्ध असणारी तहसील कचेरी मौलाली माळावरती नेण्यास जनतेचा विरोध आहे मौलाली माळावरती तहसील कचेरी झाल्यास करमाळा शहरापासून दोन किलोमीटर लांब अंतरावरती पडते शिवाय नगर टेंभुर्णी नॅशनल हायवे रोड मौलाली माळावरून जात असल्याने करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो,याचा परिणाम करमाळा बाजारपेठेवर देखील होऊ शकतो या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने मौलाली माळावरती बांधण्यात येणारे तहसील कचेरीचे टेंडर रद्द करावे अन्यथा भविष्य काळामध्ये करमाळा तालुक्यातील जनता रस्त्यावर उतरेल याची दखल घ्यावी सदर आंदोलनाचे निवेदन नायब तहसीलदार विजयकुमार लोकरे यांनी स्वीकारले वरिष्ठांना कळवतो असे आश्वासन दिले.
यावेळी आंदोलनात सहभागी कार्यकर्ते अंगद लांडगे, कालिदास कांबळे,भीमराव घाडगे, अतुल चव्हाण,अभिमान गायकवाड ,रामभाऊ नलवडे,दत्तू शिंदे, महादेव काळे ,उत्तम गायकवाड ,इरफान शेख ,अनिल जगदाळे ,श्रीराम सुरवसे ,संजय तोरमल,पांडुरंग साळुंखे ,सचिन कदम ,हंबीराव खरात ,सागर कदम ,पप्पू सरवदे ,प्रेमचंद ,लक्ष्मण भोसले ,सुरेश खरात , अर्जुन डावरे ,कयूम शेख ,भाऊसाहेब भोसले , रामा पांडव , सोमनाथ धावरे ,प्रकाश चव्हाण,विष्णू रंधवे ,अजिनाथ मार्कड ,दिगंबर मारकड ,लालमन भोई ,चैतन्य कदम ,रेवन झिंजाडे पाटील ,अर्जुन भोसले ,अधिकराव शिंदे ,मच्छिंद्रगायकवाड ,राहुल खरात ,मोहन विटकर ,सुनील बंडगर ,संतोष लावंड ,संदिपान गरड ,संदीप मारकड ,भागवत कदम ,गौतम शिंदे आधी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.