ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड टॅलेंट आहे – कुस्तीपटू आश्लेषा बागडे

करमाळा(दि. २०): “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड टॅलेंट आहे. चिकाटी, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते,” असे प्रतिपादन कुस्तीपटू आश्लेषा बागडे हिने केले.
कझाकिस्तान येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय एसीयन कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये ५९ किलो वजन गटात कांस्यपदक पटकावणाऱ्या कुमारी आश्लेषा कल्याण बागडे हिचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नाळे वस्ती आणि ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना तीने मार्गदर्शन केले..

या सत्कार समारंभात प्रमुख उपस्थितीत मुख्याध्यापक संतोष पोतदार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जालिंदर नाळे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नाळे, अनुराधा शिंदे, अश्विनी नाळे, पूजा नाळे, कैलास नाळे, काशीनाथ नाळे, बाळासाहेब येळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

या वेळी बोलताना आश्लेषा बागडे हिने सांगितले की, “कुस्तीची आवड भावाच्या प्रेरणेमुळे निर्माण झाली. आई-वडिलांनी मुलगी आहे म्हणून कधीही अडथळा आणला नाही. सतत पाठिंबा दिल्यामुळेच आज मी या टप्प्यावर पोहोचू शकले आहे.” तिने आपल्या यशाचे श्रेय वस्ताद हनुमंत फंड (इंटरनॅशनल कुस्ती संकुल, श्रीगोंदा), पालक कल्याण बागडे, रेवनाथ बनकर, परमेश्वर बागडे यांच्या मार्गदर्शनाला दिले.

करमाळा तालुक्यातील पहिलीच आंतरराष्ट्रीय पातळीवर कुस्ती गाजवणारी खेळाडू ठरण्याचा मान आश्लेषा बागडे हिला मिळाला आहे. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांमध्ये आर्या नाळे, ज्ञानेश्वरी नाळे, कविता नाळे, राणी नाळे, सृष्टि बंडगर, मोनिका नाळे, कार्तिक नाळे, स्वप्नाली नाळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनुराधा शिंदे यांनी केले.



