याला म्हणतात यश…

मुळातच चांदणे सर हे व्यक्तिमत्व असे आहे की, जे पाहताक्षणीच हवावस वाटणारं आहे. त्यांचं रंग, त्यांचं रूप, त्यांचं बोलणं, त्या बोलण्यातून निघणारे शब्द,त्या शब्दातून निघणारा अर्थ, त्यात असलेला जीवनाचा सार असं खूप काही आहे. यामुळेच चांदणे सर हे आपले मित्र आहेत याचा निश्चितच अभिमान वाटतो.
ते एका शिक्षकाचे चिरंजीव, मी ही एका शिक्षकाचाच मुलगा आहे. त्यामुळे आम्हा दोघांमध्ये एक साम्य आहे पण चांदणे सरांचे व्यक्तित्त्व सहज सोपे घडलेले नाही. प्रगती करताना समाजाने वेगवेगळ्या पायऱ्या निर्माण केल्या आहेत. या पायर्या चढणे सर्वांनाच सोपे नसते. या पायर्या ओलांडताना सरांनाही खुप त्रास झालेला आहे ,पण त्या गोष्टीचा त्यांनी कधीही खेद व्यक्त केला नाही.
एक-एक पाऊल टाकत त्यांनी वेग-वेगळ्या क्षेत्रात यश संपादन केले आहे. स्वतः मराठीचे वक्ते आहेत, सूत्रसंचालक आहेत, कवी आहेत, लेखक आहेत आणि त्याच वेळेला ते इंग्रजी विषयाचे अति उत्कृष्ट शिक्षक आहेत. मराठी साहित्यात ते जेवढे रमतात तेवढेच ते इंग्लिश असोसिएशन मध्ये रमून जातात हे त्यांचे वेगळंपण आहे. समाजातल्या काही पिचलेल्या, दबलेल्या माणसांना सातत्याने दिशा देण्याचं, आधार देण्याचं काम करतात. ज्यांनी यश मिळवलं. त्यांच्या पदरात त्यांचं माप टाकण्याचं काम ते सातत्याने करत असतात. आपल्या शाळेतल्या मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांनी भविष्यामध्ये कसं जगाव याचा चौफेर आढावा मांडण्याचं काम करत असतात.

हाच त्यांचा गुण राजाभाऊ देवींनी हेरला आणि त्यांना खास आमंत्रित करून आपल्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून नेमलं. या स्वाभिमानामुळेच निवडणूका लागतात तेव्हा शिक्षकांकडून संस्थाचालक पगार घेतात यावर ते परखडपणे लिहू शकतात. सरांना लिहीताना, बोलताना, व सामाजिक काम करताना कुठलंच क्षेत्र वर्ज्य नाही. सर देवळालीच्या शेरेवस्तीच्या शाळेपासून ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण एवढेच काय तर ज्यांनी मातोश्री वृद्धाश्रम उभा केला असे गोरे गुरुजी पर्यंत वेगवेगळ्या व्यक्ती आणि विषयावरती सहज लिहितात. कविताच्या बाबतीतही तसेच आहे.
त्यांची छायाचित्रण ही एक वेगळी कला आहे .
गेल्या दोन वर्षाखाली सर अत्यंत मोठ्या आजारातून आपल्यापर्यंत सही सलामत आलेले आहेत. जीव घेण्या आजारावरती त्यांनी मात केलेली आहे. त्यांचं नाव भीष्मा असलं तरी ते खऱ्या अर्थाने या प्रसंगातून मृत्युंजयवीर असे ठरलेले आहेत. सरांचं कौटुंबिक जीवनही अतिशय संपन्न आहे. वहिनींची मिळालेली साथ, उच्चशिक्षित कन्या, चिरंजीव हे सर्वजण त्यांच्या स्वप्नातील सार्थ ठरलेले आदर्श आहेत. त्यातच आता नातवंडाची गोड साय त्यांच्या जीवनात वेगळाच आनंद देत आहे.
सरांचा परिवार म्हणजे वैयक्तिक कुटुंब नव्हेतर ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, इंग्रजी असोसिएशन, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कमलादेवी विद्यालय, यश कल्याणी संस्था,ग्राम सुधार समिती, श्रीराम प्रतिष्ठान अशा संस्था त्यांचा परिवार आहे. स्वर्गीय भालचंद्र पाठक त्यांचे मार्गदर्शक होते. प्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजेंद्र दास, डाॅ. सुरेश शिंदे तसेच विलासराव घुमरे सर,भारतअण्णा वांगडे, प्रकाशतात्या लावंड,व्ही.आर. गायकवाड, प्राचार्य नागेश माने सर ,डोलारे साहेब,प्रदीप मोहिते सर,डाॅ.नगरे सर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मित्राबरोबर ते झोकून देऊन कार्य करत आहेत. कोपर्डीतील बालपणासाठी त्यांच्याकडे स्वतंत्र कप्पा आहे.
सर, आपणास आणखी खूप काही काम करायचं आहे, या सर्व कार्यासाठी तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्ताने खुप खुप शुभेच्छा… असंच आनंदी समाधानाने उत्साही जीवन जगत रहा आणि इतरांमध्ये आनंद उत्सव निर्माण करण्याचा कार्याचा वसा चालू ठेवा हीच तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा…!
✍️ डॉ.ॲड. बाबूराव हिरडे,करमाळा.मो.न 9423337480