विविध फसवणूक व चोरी प्रकरणातील ४ लाख रुपयांचे दागिने जप्त - तीन आरोपींना अटक -

विविध फसवणूक व चोरी प्रकरणातील ४ लाख रुपयांचे दागिने जप्त – तीन आरोपींना अटक

0

करमाळा(दि.२८): करमाळा पोलिसांनी तात्काळ हालचाली करत तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये फसवणूक व चोरी करून नेलेले एकूण ४.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने (सुमारे ४ लाख रुपये किंमतीचे) हस्तगत केले आहेत. या प्रकरणांमध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, सर्व गुन्ह्यांचा तपास वेगाने सुरू आहे.

घटना क्र. १ : वृद्ध महिलेची फसवणूक

दि. १६ मे २०२५ रोजी दत्तपेठ, करमाळा येथे सरुबाई मारुती शिंदे (वय ६०, रा. मांगी) या महिलेला दोन अनोळखी व्यक्तींनी गळ्यातील १ तोळा सोन्याचे दागिने घेऊन बनावट पितळेचे बिस्कीट दिले. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून गणेश विनायक गायकवाड (वय ३५, रा. भालगाव, ता. पाथर्डी) याला अटक केली आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली देऊन दागिने पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. तपास सपोफौ वाडगे करत आहेत.


घटना क्र. २ : जुन्या गुन्ह्याचा उलगडा

पोलिसांच्या सखोल चौकशीत आरोपी गायकवाडने सन २०२२ मध्ये करमाळा शहरातील आयसीआयसीआय बँकेसमोर एका महिलेला फसवून १ तोळा सोन्याचे दागिने लुटल्याची कबुली दिली. सदर प्रकरणात मालन रमेश काळे (रा. पोथरे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गु.र.नं. ३७३/२०२२ नुसार गुन्हा दाखल होता. याप्रकरणात दुसरा संशयित सोमनाथ निवृत्ती फुंदे (वय ४९, रा. भालगाव) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

घटना क्र. ३ : बाजारात महिलेकडून पर्स चोरी

दि. २० मे २०२५ रोजी सुभाष चौक, करमाळा येथे खरेदीसाठी आलेल्या मनिषा श्रीनाथ जाधव (वय २५, रा. सिध्दटेक, जि. अहिल्यानगर) यांच्या पर्समधून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेली होती. तपासानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने छकुली राहुल सुकळे उर्फ डुकळे (रा. गोयकरवाडी, ता. जामखेड) या महिलेला अटक करण्यात आली. तिच्याकडून २५ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. याप्रकरणाचा तपास पोहेकॉ शेळके करत आहेत.

पोलीस यंत्रणेचा समन्वय व जलद कारवाई

सदर तपासकार्य पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. प्रितम यावलकर व उपविभागीय अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. रणजित माने व त्यांच्या पथकाने केले. विशेषतः गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि सायबर पोलीस ठाण्याचे समन्वयित कार्य उल्लेखनीय ठरले.

या यशस्वी कारवाईसाठी पोलीस पथकातील पोहेकॉ अजित उबाळे, पोना मनिष पवार, वैभव टेंगल, पोकॉ ज्ञानेश्वर घोंगडे, सोमनाथ जगताप, गणेश शिंदे, अर्जुन गोसावी, तोफिक काझी, मिलिंद दहीहंडे, रविराज गटकूळ, अमोल रंदील, योगेश येवले, तसेच पोहेकॉ व्यंकटेश मोरे (सायबर पोलीस) यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!