शेतजमीन वहिवाटीच्या कारणावरून तिघांना मारहाण…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : शेतजमीन वहिवाटीच्या कारणावरून चौघांकडून तिघांना बेदम मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी करमाळा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार ४ जानेवारीला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पांडे ते शेलगाव (क) रस्त्यावर येथे घडला आहे. या प्रकरणी अनंता तुकाराम शिंदे (रा. शेलगाव क) यांनी फिर्याद दिली.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की मी व माझी पत्नी सावित्रा, मुलगा सतीश व सुन अनुसया व दोन नातवंडे असे एकत्र राहत असून, शेलगाव क व फिसरे शिवारात असलेल्या माझ्या मालकीच्या शेतजमीनीच्या उत्पनातून मी माझे कुटूंबाची उपजिविका भागवतो. फिसरे गावच्या शिवारात दहा वर्षापूर्वी खरेदी केलेली जमीव परंपरागत माझ्या नावे असलेली जमीन याच्या वाटपाच्या कारणावरून धाकटी सून रूपाली दादासाहेब शिंदे ही नेहमी कुटूंबातील सदस्यांशी वाद घालत असे. ४ जानेवारीला दुपारी साडेतीनच्या सुमारास मी व माझी थोरली सुन अनुसया असे आम्ही दोघेजण मित्राच्या शेतीमध्ये काम करीत असताना रूपाली शिंदे, शरद शिंदे हे तेथे आले व त्यांनी जमीन वाटून का देत नाही असे म्हणून आम्हा दोघांना दमदाटी, शिवीगाळ केली.
त्यावेळी मी दोघांना वाद घालू नका असे म्हणालो असता दोघांनी मिळून आम्हाला मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आम्ही झालेल्या प्रकाराची पोलीस तक्रार दिली व मी माझा मुलगा सतीश व सुन अनुसया असे तिघेजण मोटारसायकलवरून पांडे ते शेलगाव (क) रस्त्याने जात असताना अतुल चंद्रकांत दुधे, अनिकेत बिभिषण दुधे, शरद विष्णु शिंदे, रूपाली दादासाहेब शिंदे या चौघांनी आम्ही गाडी आडवली. तसेच पोलीसात तक्रार का केली व जमीनीचे वाटप का करत नाही असे म्हणून जोरजोरात शिवीगाळ केली तसेच हातातील लोखंडी गजाने व काठीने मारहाण करून मला जखमी केले. तसेच माझा मुलगा सतीश व सुन अनुसया यांनाही मारहाण केली. या प्रकरणी पोलीसांनी चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.