नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाखांची भरपाई द्यावी – आमदार नारायण पाटील यांची मागणी

करमाळा (दि.२५): गेल्या काही दिवसांपासून करमाळा मतदार संघात अवकाळी पावसाने थैमान घातले असून, त्यात अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर करमाळा मतदार संघाचे आमदार नारायण आबा पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले असून, कृषी आणि महसूल विभागाने संयुक्त पाहणी करून तात्काळ पंचनामे करावेत, अशीही मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.

अधिक माहिती देताना आमदार पाटील म्हणाले, “गेल्या दहा दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, केळी, डाळिंब, द्राक्ष, आंबा अशा पिकांसह फळबागा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वादळवाऱ्यांमुळे फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाने तातडीने संयुक्त पाहणी करून नुकसानग्रस्त भागात पंचनामे करावेत व संबंधित अहवाल शासनाकडे पाठवावेत, जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वेळेत मिळेल व विलंब होणार नाही,” असेही आमदारांनी स्पष्ट केले.

करमाळा तालुक्यातील प्रमुख उत्पादन क्षेत्र असलेल्या केळी व कांदा या पिकांचे उत्पादन कमी होण्याची शक्यता असून, या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, कृषी मंत्री, महसूल मंत्री व पालकमंत्री यांच्याकडे पाठवण्यात आल्या आहेत.



