फिनलंड देशातील पर्यटक आणि पत्रकार मिरो सायटेला यांची शेटफळ गावाला भेट

करमाळा (दि. ११) : शेटफळ (नागोबाचे) (ता.करमाळा) हे गाव सध्या परदेशी पाहुण्यांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत असून, फिनलंड देशातील प्रसिद्ध पर्यटक आणि पत्रकार मिरो सायटेला यांनी नुकतीच या गावाला भेट दिली. भारतातील आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाणारे हे गाव पाहून त्यांना वेगळाच अनुभव मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

मिरो सायटेला यांना जगभरातील अनोख्या गावांना भेट देण्याचा छंद आहे. त्यासाठी ते वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास करतात आणि तेथील संस्कृती, परंपरा, आणि वैशिष्ट्ये जगासमोर आणतात. यावेळी भारत दौऱ्यावर असताना त्यांनी उत्तर प्रदेशातील काही गावांची सफर केली. त्यानंतर इंटरनेटवर शोध घेत असताना सोलापूर जिल्ह्यातील नागोबाचे शेटफळ हे अनोखे गाव त्यांच्या नजरेस पडले. दिल्लीहून ते थेट शेटफळकडे रवाना झाले. मुंबई-पुणे मार्गे सोलापूर जिल्ह्यात येताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, कारण जिल्ह्यात तीन ‘शेटफळ’ नावाची गावे आहेत. मात्र, शेवटी योग्य गाव गाठत त्यांनी येथे दाखल होण्याचा निर्धार पूर्ण केला.


गावात आल्यानंतर स्थानिक भाषेची अडचण होती, परंतु गावातील शिक्षित युवकांनी दुभाष्याची भूमिका बजावत मिरो यांना सविस्तर माहिती दिली. गावातील प्राचीन नागनाथ मंदिराची त्यांनी पाहणी केली. नागोबाला देव मानून त्याची पूजा करणाऱ्या या गावाची परंपरा पाहून मिरो भारावून गेले. गावातील घरोघरी नाग आढळून येतात, परंतु गावकरी त्यांना मारत नाहीत, उलट काठीवर घेऊन मंदिराजवळ सोडतात. अशा प्रकारच्या सहिष्णु आणि पर्यावरणपूरक संस्कृतीचे दर्शन मिरो यांना घडले.

त्यांनी गावातील सण-उत्सवांची माहिती घेतली, तसेच जुन्या घरातील लाकडी माळवदांमध्ये नागांसाठी ठेवलेली जागा आवर्जून पाहिली. गावकऱ्यांनी केलेल्या पाहुणचाराने मिरो यांची मनःपूर्वक भरून आले. खाण्यापिण्याच्या बाबतीतही ग्रामस्थांनी विशेष लक्ष दिले.

“आजच्या विज्ञान युगातही अशी संस्कृती जोपासणारे गाव पाहून मला खूप आनंद झाला. नागोबाचे शेटफळ हे गाव खरंच जगापुढे उदाहरण ठेवणारे आहे,” अशी भावना मिरो सायटेला यांनी व्यक्त केली. गावकऱ्यांनीही परदेशातून आलेल्या पाहुण्याला पाहून विशेष आनंद व्यक्त केला. हे आगळेवेगळे अनुभव फिनलंडमध्ये पोहोचतील आणि नागोबाचे शेटफळ आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


