वडशिवणे येथील गाव रस्ता बंद- 500 हून अधिक नागरिकांची वाहतूक विस्कळीत

करमाळा, ता. 28 : वडशिवणे (ता. करमाळा) येथील माळी वस्ती, कदम वस्ती, मेहेर वस्ती, पन्हाळकर वस्ती आदी भागांना जोडणारा प्रमुख गावमार्ग एका शेतकऱ्याने जेसीबीच्या साहाय्याने खोदून त्यामधून पाण्याचा प्रवाह वळविल्यामुळे तो रस्ता पूर्णतः बंद झाला आहे. यामुळे गावातील सुमारे 500 ते 600 नागरिकांचे दैनंदिन वाहतूक विस्कळीत झाली असून मोठी अडचण निर्माण झाली आहे.
या संदर्भात गावकऱ्यांनी तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडे संपर्क करून तातडीने तो मार्ग पूर्ववत करण्याची मागणी केली. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
“हा गावातील सर्वसमावेशक सार्वजनिक रस्ता असून तो स्थानिक व्यक्तीने खोदून बंद करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. तो रस्ता तातडीने सुरू करून संबधितावर कारवाई करावी; अन्यथा आंदोलन करावे लागेल,” असा इशारा वैजनाथ कदम, शांतीलाल कदम, श्रीकांत पन्हाळकर, गणेश कोडलिंगे, ज्योतीराम वाघमारे, अनिल मेहेर, तात्या मेहेर, तेजस पाटील, गोपाळ देवकर, बालाजी देवकर, कुबेर कोडलिंगे, बाळासाहेब वनवे, बापू भानवसे आदी ग्रामस्थांनी दिला असून, ग्रामस्थांच्या निवेदनानंतरही प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही.





 
                       
                      