दृष्टी आणि कृतीमुळे घोटी गावाचा कायापालट-उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत ठरताहेत युवकांसाठी प्रेरणास्थान

करमाळा, ता.२५: दृष्टी असलेला माणूस एखाद्या गावात असेल आणि त्यांने तशी कृती केलीतर तर त्या गावाचं भविष्य कसं उजळू शकतं याचं उदाहरण म्हणजे घोटी गावाचे आहे.
घोटी येथील रहिवासी असलेले व सोलापूर येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले मनोज राऊत. स्वतः एमपीएससीच्या माध्यमातून क्लास वन अधिकारी झाले. त्यांनी केवळ शासकीय सेवा बजावत थांबण्याऐवजी, आपल्या गावातील युवकांच्या भवितव्याचा ध्यास घेतला आहे.

स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात स्वतःला जे अडथळे आले, तो त्रास पुढच्या पिढीला होऊ नये, यासाठी त्यांनी गावातच अभ्यासाची भक्कम पायाभरणी केली. सुरुवातीला पोलीस भरतीसाठी सुसज्ज अभ्यासिका उभारून युवकांना अभ्यासासाठी योग्य वातावरण उपलब्ध करून दिलं. ही केवळ नावापुरती अभ्यासिका नसून, आधुनिक ग्रंथालय, शांत बैठक व्यवस्था आणि ए.सी. सारखी आवश्यक सुविधा असलेली आदर्श अभ्यासिका ठरली आहे.
इतक्यावरच न थांबता, त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्राथमिक शाळेतही एक अत्यंत सुंदर व सुसज्ज अभ्यासिका सुरू केली आहे. या उपक्रमामुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते एमपीएससी, यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांना एकाच गावात अभ्यास व मार्गदर्शन मिळणार आहे.

गावात तयार झालेल्या या अभ्यासीकेमुळे विद्यार्थ्यांना झोकून देऊन अभ्यास करण्याची संधी मिळाली असून, युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे. त्यामुळे घोटी गावात शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि उज्ज्वल भवितव्याबाबत सकारात्मक वातावरण तयार झालं आहे.
या उल्लेखनीय कार्यामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत यांचं संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत असून, हाच पॅटर्न इतर गावांतही राबवावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
घोटीचा हा प्रयोग आज अनेक गावांसाठी व जिल्ह्य़ासाठी प्रेरणादायी ठरत आहे.


