पूर्वी हमालांना मोठ्या धान्याच्या पोत्या पाठीवर उचलाव्या लागत. एक पोत जवळपास एक क्विंटल वजनाचे असे; त्यामुळे प्रचंड शारीरिक त्रास व व्याधी उद्भवत. व्यापारी वर्गाची मनमानीही मोठी होती. या परिस्थितीत डॉ. बाबा आढाव यांनी हमालांना संघटित करून संघर्ष उभारला आणि त्यांना योग्य न्याय मिळवून दिला.
— आजीनाथ कडू, माजी उपाध्यक्ष, करमाळा तालुका हमाल पंचायत
करमाळा/ संदेश प्रतिनिधी करमाळा, ता.११:पोथरे येथे ज्येष्ठ समाजसेवक, कष्टकरी व हमाल कामगारांचे नेते दिवंगत डॉ. बाबा आढाव यांना पोथरे येथे ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त हमाल तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या श्रध्दांजली कार्यक्रमात डॉ. आढाव यांच्या प्रतिमेस करमाळा हमाल पंचायतचे माजी उपाध्यक्ष आजीनाथ कडू आणि ज्येष्ठ हमाल दत्तू झिंजाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ हमालांनी बाबा आढाव यांच्यासोबत केलेल्या विविध आंदोलनांच्या तसेच हमाल अधिवेशनांच्या आठवणी उजाळल्या. पूर्वी हमाल वर्गाला सहन करावा लागणारा त्रास कमी करून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम डॉ. आढाव यांनी केले, अशा भावना उपस्थित जुन्या हमालांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाला संतोष वाळुंजकर, धनंजय शिंदे, अकबर शेख, झुंबर कडू, शहाणू झिंजाडे, पाराजी शिंदे, संजय पुराणे, मारुती लाढाणे, अण्णा झिंजाडे, बाळासाहेब खराडे, संदीप ठोंबरे यांसह अनेक जण उपस्थित होते.प्रास्ताविक हरिभाऊ हिरडे यांनी केले तर आभार राज झिंजाडे यांनी मानले.