कंदर मधील तुषार शिंदे यांची इंडियन फॉरेस्ट सर्व्हिससाठी झाली निवड – देशात ३६ वी रँक

करमाळा (सुरज हिरडे) – कंदर (ता. करमाळा) येथील तुषार श्रीहरी शिंदे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस विभागात इंडियन फॉरेस्ट ऑफिसर (भारतीय वन अधिकारी) (वर्ग-१) या पदासाठी निवड झाली आहे. तुषार यांची देशात ३६ व्या रँक ने ही निवड झालेली आहे.

तुषार हे कंदर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातुन पुढे आलेले आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण कंदर मधील जिल्हा परिषद शाळेत तर ८ वी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण कंदर मधील कन्वमुनी विद्यालयामध्ये झाले. नववी ते दहावी इंदापूरला नारायणदास रामदास या विद्यालयांमध्ये झाले. अकरावी- बारावी टीसी कॉलेज बारामती तर त्यानंतर पदवीचे शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये माळेगाव (बारामती) येथे झाले.

तुषार यांचे स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याचे स्वप्न शाळेत असल्यापासून होते. परंतु घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने जॉब करण्याचे त्यांनी ठरविले. बारामती मध्ये २ वर्षे खाजगी कंपनीत मेंटेनन्स इंजिनिअर म्हणून काम केले. त्यानंतर पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा असे ठरवून तयारीला लागले.

यावेळी सारथी या संस्थे मार्फत दिल्ली येथे एक वर्षाच्या यूपीएससीच्या कोचिंग क्लास साठी निवड झाली. त्यानंतर सेल्फ स्टडी करत ४ वेळा यूपीएससीच्या सिव्हिल सर्व्हिस परीक्षेची तयारी केली. यात त्यांनी ४ वेळा मुख्य लेखी परीक्षा दिली असून २ वेळा दिल्ली येथे मुलाखत दिली आहे.

२०२२ रोजी त्यांनी प्रथमच यूपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस या परीक्षेसाठी तयारी करून परीक्षा दिली. यातील सर्व फेऱ्या पूर्ण करून त्यांची देशात ३६ व्या रँकने निवड झाली आहे. पुढील ३ महिन्यात त्यांना मसुरी येथे ट्रेनिंग दिले जाणार असून त्यानंतर पोस्टिंगचे चे ठिकाण त्यांना मिळणार आहे.

यूपीएससीच्या परीक्षेतून यश मिळविणारे तुषार हे कंदर मधून प्रथमच असल्याने या निवडीनंतर कंदर गावामध्ये जल्लोष करण्यात आला. कंदर परिसर तसेच करमाळा तालुक्यातुन तुषार व त्यांच्या आई-वडिलांचे अभिनंदन केले जात आहे.

माझ्या यशात आई-वडिलांचा मोठा वाटा आहे. माझ्या अपयशाच्या काळात आई-वडील, भाऊ यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला. या क्षेत्रात योग्य मार्गदर्शनासाठी ‘सारथी’ या संस्थेने मला खूप मदत केली. महेश भागवत सर (IPS) यांनी मुलाखतीच्या तयारीला मदत केली. सध्या मिळालेल्या पोस्ट बद्दल मी समाधानी आहे व ही पोस्ट मी जॉईन करणार आहे. पुढे IAS साठी तयारी चालू ठेवण्याचा मानस आहे.

तुषार शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!