करमाळ्यात बेकायदेशीर मेफेन टरमाईंड इंजेक्शन औषधाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक -

करमाळ्यात बेकायदेशीर मेफेन टरमाईंड इंजेक्शन औषधाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : डॉक्टरांच्या सुचनेशिवाय औषध खरेदी करता येत नाही; असे मेफेन टरमाईंड इंजेक्शनची विक्री करणाऱ्यांना पोलीसांनी ३० जुलैच्या रात्री अकराच्या सुमारास कमलादेवीच्या रस्त्याला रंगेहाथ पकडले आहे. यात दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश भार्गवी भोसले यांनी ५ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. यात पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ महादेव जगताप यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की ३० जुलैला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शहरात गस्त घालण्याचे काम करत असताना रात्री पावणेनऊच्या सुमारास करमाळा येथील कमलादेवीच्या रस्त्यावर बेकायदेशीरपणे ट्रोईका कंपनीच्या मेफेनटरमाईंड इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पंचांना घेऊन आम्ही अकराच्या सुमारास कमलादेवीच्या रस्त्याला गेलो असता, तेथे विजय विलास क्षीरसागर (वय २२, रा. मंगळवारपेठ, करमाळा) हा मेफेन टरमाईंड इंजेक्शनची विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडे १३ बॉक्स आढळले असून त्याची किंमत १९ हजार १६२ रूपये अशी आहे. हा सर्व माल जप्त केला आहे.

सदरचे औषध हे डॉक्टरांच्या लेखी मागणीशिवाय विक्री करता येत नाही. या औषधाचा उपयोग लो ब्लडप्रेशरसाठी केला जातो. परंतु अनेकजण हे औषध वेगवेगळ्या कारणासाठी वापरतात व त्याने माणसाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. हे विक्री करणाऱ्यास माहित असूनही त्यांनी सदरच्या औषधाची विक्री केली आहे. याबाबत चौकशी केली असता, सदरचे औषध सजीत चंदुमल सिंधी यांच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. या दोघांकडेही अधिकृत कोणताही परवाना नाही. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला, त्यानंतर या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनायक माहुरकर हे करत आहेत.

श्री.माहुरकर यांनी या दोघांना आज न्यायालयात हजर केले असता, शासकीय अभियोक्ता ॲड. सचिन लुणावत यांनी आरोपींचा गुन्हा हा मानवी प्रकृतीवर दुष्परिणाम करणारा आहे. याबाबत सविस्तर चौकशी करणे आवश्यक असल्याने सात दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार न्यायाधीश भोसले यांनी ५ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. माहुरकर करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!