मस्जिद परिसरातील वादातून दोन्ही गटांत मारामारी – दोन्ही गटावर गुन्हे दाखल

करमाळा(दि. २५): केम (ता.करमाळा) गावातील मस्जिद परिसरात सफाईच्या कामावरून झालेल्या वादाचे रुपांतर गंभीर मारामारी झाली. यामध्ये दोन्ही गटांचे एकूण १३ जण सामील असून, दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. ही घटना २३ जुलै २०२५ रोजी सकाळी ९.०० ते ९.३० च्या दरम्यान घडली.

यात पहिली फिर्याद सुलतान रमजान मुलाणी (रा. केम) यांनी दिली त्यात त्यांनी म्हटले की, ते मस्जिदच्या आवारात सफाई करत असताना इन्नुस बाबा पठाण वहीवर काहीतरी लिहीत असल्याचे निदर्शनास आले. त्यास विचारणा केली असता, तो रागात गेला व काही वेळात इन्नुस पठाण व त्याच्या नातेवाईकांना म्हणजे दिलावर पठाण, नजीर पठाण, अस्लम पठाण, सरदार पठाण व मुसा पठाण हे लोखंडी रॉड व पाईपसह आले. त्यांनी राजाने मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी नातेवाईक युनुस बाबुलाल पठाण हे सोडवण्यास आले असता त्यांनाही मारहाण केली व लाथाबुक्यांनी झोडपले आणि शिवीगाळ-धमकी दिली.

दुसरी फिर्याद दिलदार करीम पठाण (रा. केम) यांनी दिली. त्यात त्यांनी म्हटले की, त्यांचे चुलत भाऊ इन्नुस पठाण लघवीसाठी मस्जिद परिसरात गेले असता सुलतान मुलाणी व युनुस पठाण यांनी त्यास धमकावले. नंतर काही वेळात सुलतान मुलाणी, युनुस पठाण, पाप्या, आशपाक, शहाबाज आणि अनिस (सर्व मुलाणी) यांनी लोखंडी रॉड व काठ्यांनी त्यांच्या घरी येऊन मारहाण केली. फिर्यादी दिलदार पठाण यांना पाठीवर, तर त्यांच्या भावाला नजीर पठाण यांना गंभीर दुखापत केली. तसेच जिवे मारण्याची धमकीही दिली. या दोन्ही घटनेत एकूण १३ व्यक्तींचा समावेश असून दोन्ही गटविरूध्द एकमेकांविरुद्ध मारहाणी, शिवीगाळ, धमकीचे गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास सुरू केला आहे.



