करमाळा-नगर रस्त्यावर पीकअपची समोरा समोर धडक
एकाचा मृत्यू – १५ जण जखमी

करमाळा (दि. १९) : अहिल्यानगरहून पंढरपूरला देवदर्शनासाठी जाणाऱ्या पिकअपला भरधाव पिकअपने समोरून जोरदार धडक दिल्याने गंभीर अपघात होऊन यामध्ये एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे तर १५ जण जखमी झाले आहेत. ही घटना आज (ता. १९) सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास जातेगाव (ता.करमाळा) येथे घडला आहे.

यात हकीकत अशी, की ओणे(ता. निफाड, जि. नाशिक) येथील १६ जण पिकअप करून देवदर्शनासाठी पंढरपूरला निघाले होते. जातेगाव या ठिकाणी आले असता, समोरून एका भरधाव पिकअप चालकाने जोराची धडक दिली. या धडकेत १५ जणांचे हात-पाय फॅक्चर झाले असून एक वृध्द महिला गंभीर जखमी झाली होती. तिचे उपचारा दरम्यान निधन झाले आहे.

या जखमीमध्ये सागर कुंद्रा हळदे, ऋषीकेश रामनाथ कातकाडे, रावसाहेब बाळासाहेब हळदे, सतीश रामदास हळदे, निर्मला रावसाहेब हळदे, फाशाबाई सुखदेव कातकाडे, सिंधु ज्ञानेश्वर गोसावी, लक्ष्मीबाई गोविंद हळदे, कमला रामनाथ हळदे, रंभाबाई गंगाधर हळदे, जिजाबाई हळदे, बेबीबाई बाबूराव बागले, रत्ना रामदास हळदे, सुमनबाई रामदास हळदे (सर्व रा. ओणे, ता. निफाड, जि. नाशिक) यांचा समावेश आहे. सर्व जखमींना करमाळा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


दोन पिकअपची समोरासमोर धडक झाल्याने मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी जमा झाले. यात पिकअपमधील काही महिला पिकअपमधून खाली पडल्या होत्या, तर काही पिकअपमध्येच एकमेकांना धडकून जखमी झाल्या. त्यानंतर घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल मयुर कदम, आनंद पवार, गव्हाणे आदींनी तात्काळ भेट दिली. यावेळी अॅम्ब्युलन्सला तातडीने पाचारण करण्यात आल्याने जखमींना येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. समोरच्या पिकअपचा चालक मात्र अपघात घडताच पळून गेला आहे.
उपजिल्हा रूग्णालयात वारकऱ्यांना लागल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली. अनेक महिला वेदना सहन न झाल्याने आक्रोश करत होत्या.

जातेगाव-टेंभुर्णी रस्त्याचे चौपदरीकरण कधी पूर्ण होणार?
अहिल्यानगर ते जातेगाव या रस्त्याचे चौपदरीकरण पूर्ण झाल्याने या मार्गावरून वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली असून वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. मात्र, पुढील जातेगाव ते टेंभुर्णी रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम अद्याप प्रलंबित आहे. करमाळा ते टेंभुर्णी दरम्यान काही ठिकाणी रस्ता चौपदरी असला तरी जातेगाव ते करमाळा हा सुमारे १३ किलोमीटरचा रस्ता अजूनही दुपदरीच आहे.

या रस्त्यावर वाहनांची रांगच रांग लागत असल्याने गाड्यांना क्रॉस करणे अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे रस्त्यावर एका आठवड्यात किमान एक अपघात होत आहे. दुचाकीस्वारांना तर जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. आजपर्यंत अनेक छोटे-मोठे अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत.
या पार्श्वभूमीवर, जातेगाव ते टेंभुर्णी रस्त्याचे चौपदरीकरण तातडीने पूर्ण करणे गरजेचे झाले आहे.


