बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन मिनी गंठण चोरी; दोन महिला चोरट्या जेरबंद -

बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन मिनी गंठण चोरी; दोन महिला चोरट्या जेरबंद

0

करमाळा (दि. १९ जुलै) : करमाळा बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण लांबवणाऱ्या दोन महिला चोरट्यांना करमाळा पोलिसांनी अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 1 तोळा 4 ग्रॅम वजनाचे मिनी गठण जप्त करण्यात आले आहे.

या घटनेची हकीकत अशी की, दिनांक 13 जुलै 2025 रोजी दुपारी 3.10 वाजता कोमल चंद्रकांत गोरे (वय 28, रा. अंतरगाव, ता. भूम, जि. धाराशिव, सध्या रा. करमाळा) या आपल्या मुलासह गावी जाण्यासाठी करमाळा बसस्थानकावर आल्या होत्या. त्या परांडा जाणाऱ्या बसमध्ये बसण्यासाठी रांगेत उभ्या असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात महिला आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गठण (1 तोळा 4 ग्रॅम) चोरले.

फिर्यादीवरून करमाळा पोलीस ठाण्यात गु.र.नं. 560/2025 भारतीय दंड संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार व महिला पोलीस अंमलदारांची दोन पथके तयार करून तपासासाठी रवाना करण्यात आली.

सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदाराच्या माहितीनुसार, पोलिसांनी तात्काळ सापळा रचून दोघी महिलांना अटक केली. त्यांची नावे पुढीलप्रमाणे :

1. वर्षा इंतेज चव्हाण (वय 20, रा. तांदळे वडगाव, जि. अहिल्यानगर)

2. राधिका शुभम पवार (वय 23, रा. वजिरखेडा, पो. पिंपळगाव कोलते, ता. भोकरदन, जि. जालना)

सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र महिला पोलीस अंमलदारांनी विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 1,25,000 रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गठण जप्त करण्यात आले आहे.

या कारवाईत पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
ही यशस्वी कारवाई पोनि रणजित माने, पोसई संदीप बनकर, पोहेकॉ अजित उबाळे, पोना मनीष पवार, वैभव ठेंगल, अर्जुन गोसावी, स्वप्नील शेरखाने, रविराज गटकुळ, अमोल रंदिल, योगेश येवले, मिलिंद दहिहांडे, गणेश खोटे, तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ व्यंकटेश मोरे यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!