उजनी धरण भरले १००%
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – गेले अनेक दिवस धरण परिसरात सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे जवळपास भरल्यामुळे होणाऱ्या विसर्गामुळे सोलापूर जिल्ह्याची जीवनदायींनी असलेल्या उजनी धरण १०० टक्के भरले असून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. आज ५ ऑगस्ट, दुपारी १२ वा च्या पाणी पातळी विषयी मिळालेल्या माहिती नुसार उजनीत ११७.२३ टीएमसी इतका पाणीसाठा झालेला आहे. उजनी धरणात सध्या २ लाख ३ हजार ५४७ क्युसेक्स ने दौंड मधून पाणी जमा होत आहे. पाणी पातळी ४९६. ८३०मी. इतकी आहे. सध्या धरण +१०० टक्के भरले आहे.
दर तीन वर्षांनी उजनी धरण शंभर टक्क्यांवर भरून वाहण्याचा अनुभव जमेस आहे. २०२३ मध्ये उजनी ६० टक्के भरली होती. यंदा पुणे जिल्ह्यातील दमदार पावसाने यंदाच्या उन्हाळ्यात वजा ६६ टक्क्यांवर गेलेले धरण पावसाळा दोन महिने शिल्लक असताना +१०० टक्क्यांपर्यंत आले आहे. २०२२ मध्ये उजनी तब्बल १११.२३ टक्के (१२३.२८ टीएमसी) भरली होती.
- उजणी धरणातून आज सोडलेला विसर्ग
- भीमा नदी १००००० क्यूसेक
- बोगदा ९०० क्यूसेक
- वीज निर्मिती १६०० क्यूसेक
- सिनामाढा उपसा १०५ क्यूसेक
- दहीगाव उपसा १०० क्यूसेक
उजनी धरण 100% भरले असल्याने तातडीने जिल्ह्यातील कालवे, तलाव भरून घेतले पाहिजेत तसेच वर्षभर या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे अशी अपेक्षा लोकांनी केली आहे.
उजनी धरणाची क्षमता
उजनी धरण 100 टक्के भरल्यानंतर 117 टीएमसी पाणीसाठा जमा होतो, तर 111 टक्के भरल्यानंतर 123 टीएमसी पाणीसाठा जमा होतो. 63.65 टीएमसी मृत साठ्यात धरले जाते, तर 53.34 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा धरला जातो.