उजनीने केले अर्धशतक पार - Saptahik Sandesh

उजनीने केले अर्धशतक पार

करमाळा(संदेश प्रतिनिधी) -सोलापूर जिल्ह्याची वरदायीनी असलेल्या उजनी धरणाने काल संध्याकाळी अर्धशतक पूर्ण केले असून सध्या धरण ५२.२२ टक्के (४ ऑक्टोबर) भरलेले आहे. पाण्याची एकूण पाणीपातळी- ४९४.४४० मी आहे. सध्या उजनी मध्ये ९१.६४ टीएमसी पाणीसाठा असून २७.९८ टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. (मृत साठा ६३.६६ टीएमसी)

उजनीत दौंडकडुन येणारा विसर्ग १४७५७ क्यूसेक इतका आहे. उजनीतून सध्या सिना-माढा उपसा सिंचन योजनेला २२२ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. तसेच करमाळा तालुक्यासाठी २ ऑक्टोबर पासून दहीगाव उपसा सिंचन योजनेतुन ८० क्यूसेक इतका विसर्ग चालू असून इतर सर्व विसर्ग बंद आहेत.

गेल्या वर्षी (२०२२) १३ ऑगस्ट पर्यंत उजनी धरण १००% भरलेले होते. परंतु यावर्षी पावसाळ्याच्या सुरवातीच्या ४ महिन्यात अत्यल्प झालेल्या पावसामुळे यावर्षी सोलापूर जिल्ह्यासह राज्यात दुष्काळाची छाया पसरली होती. परंतु अखेरच्या टप्प्यात परतीच्या पावसाने दिलासा दिला. धरण परिसरात झालेला पाऊस व पुणे जिल्ह्यातील झालेल्या पावसाने धरण भरण्यास गती मिळाली. सध्या पुणे जिल्ह्यातील कुकडी, खडकवासला, वरसगाव, टेमघर आणि पानशेतमधील पाणीही उजनीकडे येत आहे. वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही तिन्ही धरणे १०० टक्के भरली असून टेमघर ८०% भरलेले आहेत. अजून थोडे दिवस पाऊस पडला तर उजनी ७०-८०%पर्यंत भरू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!