उमरड-केडगाव भुयारी मार्गाचे काम सुरू – वाहतूक सुलभ होऊन वेळेची बचत होणार

केम (संजय जाधव) : उमरड ते केडगाव दरम्यान रेल्वे लाईनखाली भुयारी मार्ग व्हावा, ही नागरिकांची अनेक वर्षांची मागणी अखेर मार्गी लागली आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर कुगाव, चिखलठाण, दहिगाव, शेटफळ, केडगाव या परिसरातील नागरिकांना करमाळा, राशिन, भिगवनकडे जाण्यासाठी मोठा फायदा होणार असून प्रवास अधिक सुलभ व वेळ बचत करणारा ठरणार आहे. ऊस वाहतुकीसाठीही हा मार्ग फायदेशीर ठरेल.

हे काम व्हावे यासाठी बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम, उमरडचे माजी सरपंच संदीप मारकड पाटील यांनी ही मागणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार नारायण आबा पाटील तसेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत खासदार मोहिते पाटील यांनी रेल्वेमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत भुयारी मार्गाचे काम नुकतेच सुरू करण्यात आले आहे.

या कामाचा नुकताच शुभारंभ झाला असून खोदकामास सुरवात झाली आहे.
- उमरड ते केडगाव भुयारी मार्ग विकसित झाल्यावर या मार्गाचा केडगाव, चिखलठण, कुगाव, दहिगाव शेटफळ या परिसरातील सुमारे १५ हजार लोकसंख्येला मोठा फायदा होईल.
- या मार्गामुळे उमरडमार्गे करमाळा, राशीन, भिगवण तसेच भैरवनाथ, माकाई, आंबालिका आणि बारामती अॅग्रो या साखर कारखान्यांमध्ये जाण्या-येण्यासाठीचा प्रवास सुलभ व जलद होईल.
- ऊस वाहतुकीसाठीही हा मार्ग अत्यंत उपयुक्त ठरेल. यामुळे अंदाजे ३० किलोमीटर अंतराची बचत होऊन वेळ, इंधन आणि खर्च यांचीही बचत होणार आहे.
- हा प्रकल्प स्थानिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.







